जामखेड | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील दरडवाडी येथे जमीन हडपण्याचा प्रयत्न, वारंवार होणारा मानसिक छळ आणि धमक्यांना कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेपूर्वी संबंधित शेतकऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून काही व्यक्तींवर गंभीर आरोप केल्याने संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दरडवाडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथील विकास सातदेव रणशिंग (वय ४०) यांनी रविवारी (दि. २६ जुलै) सकाळी साडेनऊच्या सुमारास घरासमोरील रस्त्यालगत असलेल्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब त्यांच्या पत्नी विद्या विकास रणशिंग यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने त्यांना तातडीने खर्डा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे नेण्यात आला. दरम्यान, मृत विकास रणशिंग यांचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेला एक व्हिडिओ आढळून आला. या व्हिडिओमध्ये त्यांनी दोन व्यक्तींवर जमीन बळकावण्याचा प्रयत्न, वारंवार धमक्या देणे तसेच मानसिक छळ केल्याचे गंभीर आरोप केले असल्याचे समोर आले आहे.
माहितीनुसार, महादेव गोवर्धन दराडे (रा. दरडवाडी) यांच्याशी काही वर्षांपासून जमिनीच्या वादातून वाद सुरू होता. तसेच शेतात जाणाऱ्या रस्त्याच्या वापरावरून आणि शेतीसाठी टाकलेल्या इलेक्ट्रिक पोलच्या लाईनवरूनही दोन्ही बाजूंमध्ये मतभेद होते. या कारणावरून सातत्याने वाद होत असल्याचा तसेच धमक्या मिळत असल्याचा उल्लेखही मृताने व्हिडिओमध्ये केला असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आत्महत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गावात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी खर्डा पोलीस ठाण्यात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या.
मृताच्या पत्नी विद्या रणशिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महादेव गोवर्धन दराडे (रा. दरडवाडी) व चंद्रकांत तात्या काळे (रा. बाळेवाडी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डेक्कर करीत आहेत. पोलिसांकडून व्हिडिओची सत्यता, जमिनीच्या वादाची पार्श्वभूमी आणि इतर पुराव्यांची पडताळणी सुरू असून तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
टीप : प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधित आरोपींवरील आरोप हे फिर्यादी व प्राथमिक तपासावर आधारित आहेत. न्यायालयीन प्रक्रियेनंतरच दोष निश्चित होईल.