कुपवाड : प्रतिनिधी
कुपवाड शहरातील महापालिका शाळा क्रमांक ३६ च्या चैतन्य नगर येथील भागशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी महापालिका प्रशासनाकडून बस उपलब्ध करून देण्यात आली. या बस प्रदान सोहळ्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चैतन्य नगर येथील भागशाळेतील सुमारे ४० विद्यार्थ्यांना विवेकानंद सोसायटी येथील महापालिका शाळा क्रमांक ३६ मध्ये ये-जा करण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर करावा लागत होता. या वाहतुकीचा खर्च शाळेतील शिक्षक स्वखर्चाने उचलत होते. ही बाब शिक्षकांनी उपमहापौर गजानन मगदूम यांच्या निदर्शनास आणून दिली.
विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शैक्षणिक सोयीचा विचार करून उपमहापौर गजानन मगदूम यांनी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर प्रशासनाने शाळेसाठी विद्यार्थी वाहतुकीची बस उपलब्ध करून दिली.
बस प्रदान सोहळ्याप्रसंगी उपमहापौर गजानन मगदूम, नगरसेविका योगिता राठोड, माजी नगरसेवक शेडजी मोहिते, सहाय्यक आयुक्त आनिस मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते सागर खोत यांच्यासह शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि नियमित प्रवासासाठी बस उपलब्ध करून दिल्याबद्दल महापालिका प्रशासन व उपमहापौर गजानन मगदूम यांचे आभार व्यक्त केले.