नांदेड :- जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या आषाढी महोत्सवात शनिवारी (ता. २५) शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह भक्तिरसाने भारावून गेले. सुप्रसिद्ध गायिका, सारेगमप महाविजेती कार्तिकी गायकवाड-पिसे आणि गौरव महाराष्ट्राचा महाविजेता कौस्तुभ गायकवाड यांच्या सुरेल अभंगांनी उपस्थित नांदेडकरांना अक्षरशः भक्तीच्या सागरात चिंब भिजवले.
'विठू माऊली तू माऊली जगाची...', 'टाळी वाजवावी गुढी उभी राहिली...' तसेच 'खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाळी रे...' यांसारख्या अभंगांच्या सादरीकरणाने सभागृहात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. प्रत्येक अभंगाला उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.
महासोहळ्याचे उद्घाटन काँग्रेस दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय सचिव रेहाना चिश्ती, माजी आमदार ईश्वरराव भोसिकर, ह.भ.प. भाऊसाहेब पावडे महाराज, ज्येष्ठ काँग्रेस नेते हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, प्रा. यशपाल भिंगे, सुरेश गायकवाड, सुरेंद्र घोडजकर, श्रावण रँपनवाड, स्मिता शहापूरकर, डॉ. दिनेश निखाते, अब्दुल हफीज, तिरुपती कोंढेकर, अब्दुल गफ्फार, एकनाथ मोरे, आनंद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात आयोजक विठ्ठल पावडे यांनी आषाढी महोत्सवाची भूमिका स्पष्ट करताना वारकरी संप्रदायाने बालपणापासून आपल्या जडणघडणीवर केलेले संस्कार सांगितले. वारकरी संप्रदाय हा सर्व जाती-धर्मांना एकत्र आणून सामाजिक समतेचा संदेश देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले. "हा महोत्सव सर्वांचा असून आपले प्रेम व आशीर्वादच मला दरवर्षी हा उपक्रम राबविण्याची प्रेरणा देतात," असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय सचिव रेहाना चिश्ती यांनी आपल्या मनोगतात मराठवाडा ही संतांची भूमी असून सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक असल्याचे सांगितले. नांदेडसारख्या पवित्र भूमीत अशा भक्तिमय कार्यक्रमाला उपस्थित राहणे हा आनंददायी अनुभव असल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्घाटक खासदार रवींद्र चव्हाण यांनी आयोजक विठ्ठल पावडे यांच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचे कौतुक करताना, "मानवता धर्माला केंद्रस्थानी ठेवून समाजाला एकत्र आणणारे कार्यक्रम आयोजित करणारे व्यक्तिमत्त्व फार दुर्मिळ असते," असे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाचे सुंदर निवेदन पूजा थिगळे यांनी केले, तर सूत्रसंचालन मुरलीधर हंबर्डे यांनी केले. आषाढी महोत्सवाला नांदेडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून भक्तीचा अनोखा सोहळा अनुभवला.
---
चौकट : आयोजक विठ्ठल पावडे म्हणाले...
> "माझी जडणघडण वारकरी संप्रदायात झाली आहे. वारकरी संप्रदाय सामाजिक समतेचा संदेश देतो. हा आषाढी महोत्सव कोणत्याही एका व्यक्तीचा नसून सर्व समाजाचा आहे. आपले प्रेम आणि आशीर्वाद यामुळेच हा भक्तीमय उपक्रम सातत्याने राबविण्याची प्रेरणा मिळते."