नांदेड :- पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या सीएटीसी-७१६ (Combined Annual Training Camp) मध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या महात्मा फुले हायस्कूल, बाबानगर येथील एनसीसी एअर विंगच्या कॅडेट्स तसेच 'फर्स्ट ऑफिसर' पदावर पदोन्नती मिळालेल्या असोसिएट एनसीसी ऑफिसर दत्ता बारसे यांचा शाळेत विशेष सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
सीएटीसी-७१६ शिबिरात महात्मा फुले हायस्कूलच्या कॅडेट्सनी उत्कृष्ट शिस्त, नेतृत्व आणि संघभावनेचे प्रदर्शन करत प्रतिष्ठेच्या मुख्य ड्रिल (संचलन) स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपदाची ट्रॉफी मिळवली. या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळेसह नांदेड जिल्ह्याचा गौरव झाला.
याच शिबिरादरम्यान एनसीसी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत असोसिएट एनसीसी ऑफिसर दत्ता बारसे यांना 'सेकंड ऑफिसर' वरून 'फर्स्ट ऑफिसर' पदावर पदोन्नती देण्यात आली. ३ महाराष्ट्र एअर स्क्वाड्रन एनसीसी, पुणेचे कमांडिंग ऑफिसर विंग कमांडर एस. एस. मराठे तसेच विंग कमांडर अर्पण चंदा यांच्या हस्ते त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला.
या यशानिमित्त आयोजित सत्कार समारंभात शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव रावसाहेब शेंदारकर, खजिनदार ॲड. उदयरावजी लिंबाळकर, मुख्याध्यापिका सौ. सुरेखा कदम, पर्यवेक्षक एस. व्ही. जाधव, खानझोडे सर यांच्या हस्ते विजयी कॅडेट्स व दत्ता बारसे यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी एनसीसी आर्मी विंगचे अधिकारी पी. एस. केंद्रे, साईनाथ काढले यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कॅडेट्सच्या यशाचे कौतुक करत भविष्यातही अशाच उज्ज्वल कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.
या यशामुळे महात्मा फुले हायस्कूलच्या एनसीसी एअर विंगच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाची आणि गुणवत्तापूर्ण कार्याची पुन्हा एकदा राज्यस्तरावर दखल घेण्यात आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.