नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने आणि महापौर *सौ.कविता संतोष मुळे* यांच्या विशेष पुढाकारातून मुख्यमंत्री जन आरोग्य शिबीरा अंतर्गत आयोजित करण्यात आलेले भव्य 'महिला आरोग्य तपासणी शिबीर' बुधवार दि.२२ जुलै २०२६ रोजी महापालिकेच्या शिवाजी नगर येथील मातृसेवा केंद्रात उत्साहात संपन्न झाले. या शिबिराच्या माध्यमातून शहरातील शेकडो गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सामान्य कुटुंबांतील महिलांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार पुरविण्यात आले. महिलांचे आरोग्य हाच कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ आहे, या विचाराने महिलांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करणे आणि त्यांना जागेवरच तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.
महिलांच्या आरोग्य तक्रारींचे वेळेत निदान व्हावे यासाठी *महापौर सौ.कविता संतोष मुळे* यांनी पुढाकार घेऊन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला या विशेष शिबिराच्या आयोजनाचे निर्देश दिले होते. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी *महापौर सौ.कविता संतोष मुळे, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत, विधानपरिषद आ.अमर राजुरकर, माजी महापौर जयश्री पावडे, स्विकृत सदस्य डॉ.अंकुश देवसकर, विजय येवणकर, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत रिठ्ठे* आणि पालिकेतील इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या शिबीराचा शहरातील विविध प्रभागांतून आलेल्या माता-भगिनींनी आणि किशोरवयीन मुलींनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला. या शिबिरात आलेल्या महिलांसाठी अत्यंत सुसज्ज अशा तपासणी कक्षांची व्यवस्था करण्यात आली होती. ज्यामध्ये संपूर्ण सेवा पूर्णपणे मोफत पुरविण्यासह स्त्रीरोग तज्ज्ञ, फिजीशियन व इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलांची सखोल तपासणी केली. ज्यामध्ये रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन आणि इतर आवश्यक प्राथमिक चाचण्या मोफत करण्यात आल्या. त्याचप्रमाणे महिलांमध्ये वाढत्या कर्करोगाच्या धोक्याचा विचार करता विशेष तपासणी करण्यात आली. तपासणी नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांना आवश्यक ती सर्व औषधे महानगरपालिकेमार्फत मोफत देण्यात आली आहेत.
*प्रतिक्रिया व कृतज्ञता*
या प्रसंगी बोलताना *महापौर सौ.कविता संतोष मुळे* यांनी सांगितले की, "महिला स्वतःच्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. आजार बळावण्यापूर्वीच त्याचे निदान व्हावे यासाठी मनपाने हे पाऊल उचलले आहे. भविष्यातही शहरातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी नांदेड मनपा कटिबद्ध राहील."
त्याचप्रमाणे *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी सांगितले की, 'महिला आरोग्य तपासणी शिबीर' केवळ एक उपक्रम नसून, शहरातील प्रत्येक भगिनीपर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचवण्याचा आमचा एक प्रामाणिक संकल्प आहे. या शिबिरामध्ये केवळ प्राथमिक तपासणी करुन वेळेत निदान व्हावे यावर आम्ही विशेष भर दिला आहे. त्यामुळे शहरातील माता-भगिनींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि मनपाच्या आरोग्य सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मी करतो."
या शिबिरात तपासणीसाठी आलेल्या अनेक महिलांनी मनपाच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आणि आभार मानले. आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका, आशा वर्कर्स आणि मनपा कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे हे शिबीर अत्यंत यशस्वीरित्या पार पडले.