मुंबई, दि. २२ जुलै : पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते मिरज दरम्यान आणखी दोन एकमार्गी आषाढी विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्रमांक ०११८३ ही एकमार्गी विशेष गाडी २५ जुलै २०२६ रोजी सीएसएमटी येथून दुपारी ३.२० वाजता सुटून २६ जुलै रोजी पहाटे ३.३० वाजता मिरज येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११८१ ही एकमार्गी विशेष गाडी २६ जुलै २०२६ रोजी सीएसएमटी येथून रात्री १२.२५ वाजता सुटून त्याच दिवशी सकाळी ११.२५ वाजता मिरज येथे पोहोचेल.
या दोन्ही विशेष गाड्यांना *दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी आणि पंढरपूर* येथे थांबे देण्यात आले आहेत.
दोन्ही गाड्यांची रचना १ एसी द्वितीय श्रेणी, ३ एसी तृतीय श्रेणी, ८ स्लीपर, ४ जनरल द्वितीय श्रेणी तसेच २ जनरल सेकंड क्लास सीटिंग-कम-गार्ड ब्रेक व्हॅन अशी असेल.
या विशेष गाड्यांसाठी २३ जुलै २०२६ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTC संकेतस्थळावर आरक्षण सुरू होणार आहे. प्रवासी RailOne ॲपद्वारेही तिकीट बुक करू शकतात.
गाड्यांच्या सर्व थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी NTES ॲप किंवा रेल्वेच्या अधिकृत चौकशी संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी केले आहे.