नांदेड:-मा. पोलीस अधीक्षक, डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामिण यांच्या पथकाने प्रभावी कारवाई करत पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीत मौजे वाहेगाव येथील गोदावरी नदी पात्रातुन अवैधरित्या रेती उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करत सुमारे ₹1,75,50,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त व नष्ट केला आहे.
दिनांक 11 जुलै 2026 रोजी पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार हे अवैध रेती उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी गस्त घालत असताना, मौजे वाहेगाव येथील गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पोलीस पथकाने पंचांसह घटनास्थळी छापा टाकला. कारवाई दरम्यान दोन हायवा आरोपींसह ताब्यात घेण्यात आले. तसेच नदीपात्रातुन स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना अवैधरित्या रेती उपसा करणारे चार आरोपी पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून फरार झाले.
घटनास्थळी तपासणी केली असता अवैध रेती उत्खननासाठी वापरले जाणारे दोन लोखंडी बोटी, सात इंजिने, चाळीस तराफे तसेच त्यावरील रेती आढळून आली. नदीपात्रातील साहित्य बाहेर काढणे शक्य नसल्यामुळे पंचांसमक्ष नियमानुसार सदर साहित्य जागेवरच नष्ट करण्यात आले. जप्त व नष्ट करण्यात आलेला मुद्देमाल - 1) भारत बेंझ कंपनीचा हायवा (MH-26 CV-2982) अंदाजे ₹55,25,000/- व टाटा कंपनीचा हायवा (MH-08 W-8329) अंदाजे ₹45,25,000/-, 2) दोन लोखंडी बोटी - ₹30,00,000/-(जागेवर नष्ट), 3) सात इंजिने ₹21,00,000/- (जागेवर नष्ट), 4) चाळीस तराफे व त्यावरील रेती -₹24,00,000/- (जागेवर नष्ट) असा एकूण मुद्देमाल: ₹1,75,50,000/-
या प्रकरणी किरण साहेबराव भुरे (वय 26, रा. बोरगाव तेलंग, ता. जि. नांदेड) व अर्जुन बालाजी पवार (वय 21, रा. देवणेवाडी तांडा, ता. लोहा, जि. नांदेड) तसेच फरार असलेल्या अन्य चार आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन नांदेड ग्रामिण गु.र.नं. 855/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3(5), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मधील कलम 48(7), 48(8) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम, 1986 मधील कलम 9 व 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. ओमकांत चिंचोलकर, पोलीस उप निरीक्षक / बाबुराव चव्हाण, पोह/2565 जेंकुट, पोकॉ/856 गुरुनाथ कारामुंगे, पोकॉ/20 जाधव, पोकॉ/516 कदम, पोकॉ/427 जमीर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने अवैध रेती उत्खनन, वाहतूक व पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले असून, नागरिकांनी अशा प्रकारची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.