युवराज आदित्यराजे पटवर्धन यांचा उपक्रम; ७१ प्रतिभावंतांचा सन्मान
सांगली शहरातील सोशल मीडिया विश्वात कार्यरत असलेल्या क्रिएटर्स आणि कलावंतांचा सन्मान करण्यासाठी गणपती पंचायतन संस्थांनच्या वतीने ‘डिजिटल आयकॉन अवॉर्ड्स’ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. गणपती मंदिरातील हि.हा विजयसिंहराजे पटवर्धन सभागृहात पार पडलेला हा सोहळा उत्साह, प्रेरणा आणि सकारात्मकतेचा संगम ठरला.
आजचे युग हे सोशल मीडियाचे युग मानले जाते. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण या माध्यमाशी जोडला गेला आहे. एखादी माहिती क्षणात जगभर पोहोचवण्याची ताकद या माध्यमात आहे. मात्र, या शक्तीचा गैरवापर करून अफवा, चुकीची माहिती आणि नकारात्मकता पसरवण्याचे प्रकारही वाढताना दिसतात. अशा परिस्थितीत काही तरुण क्रिएटर्स आपल्या सर्जनशीलतेच्या माध्यमातून सांगलीचा इतिहास, संस्कृती, समाज आणि सकारात्मक पैलू जगासमोर मांडण्याचे काम करत आहेत. हेच कार्य ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाला वीरू वज्रवाड, सचिन भाऊ कदम आणि उदय गोडबोले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या सोहळ्यात उत्कृष्ट कंटेंट क्रिएटर, ब्लॉगर, पेज अॅडमिन, कॉमेडी आर्टिस्ट, एडिटिंग आर्टिस्ट अशा विविध श्रेणींमध्ये तब्बल ७१ प्रतिभावंतांचा ‘डिजिटल आयकॉन अवॉर्ड्स’ने सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना आदित्यराजे पटवर्धन म्हणाले, हा पुरस्कार केवळ सन्मान नसून सोशल मीडियाच्या सकारात्मक शक्तीचा गौरव आहे. समाजाला दिशा देणारे, चांगल्या गोष्टी शिकवणारे आणि लोकांची मानसिकता सकारात्मक बनवणारे हे सर्व क्रिएटर्स खऱ्या अर्थाने समाजघटक आहेत. त्यांच्या कार्याला अधिक बळ मिळो आणि त्यांनी आपल्या क्षेत्रात अधिक यश संपादन करावे, हीच शुभेच्छा.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विविध क्रिएटर्सनी आपल्या संघर्षमय प्रवासाची, यश-अपयशाची आणि अनुभवांची मोकळेपणाने मांडणी केली. या संवादातून एकमेकांना प्रेरणा मिळाली आणि सोशल मीडिया क्षेत्रातील तरुणांमध्ये एक नवे बंध निर्माण झाले.
प्रमुख पाहुण्यांनीही आपल्या मनोगतातून सोशल मीडियाच्या जबाबदारीची जाणीव करून देत सकारात्मक कंटेंट निर्मितीचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक क्रिएटर्सना हजारो ते लाखो फॉलोअर्स आहेत. त्यांच्या या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी सर्वांनी एकत्र येत केक कापून जल्लोष केला. शेवटी गणरायाची आरती करून सर्व क्रिएटर्सना समाजासाठी अधिक चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा आणि बळ मिळावे, अशी प्रार्थना करण्यात आली.
या प्रसंगी जयदीप अभ्यंकर, अरुंधती अभ्यंकर, यश अक्कीमडी, माधुरी कुलकर्णी यांच्यासह मोठ्या संख्येने सोशल मीडिया क्रिएटर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती लाभली..