कुपवाड येथील नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज चॅरिटेबल ट्रस्ट या शैक्षणिक संस्था गेल्या ५० वर्षांपासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. या संस्थांच्या शाळांमध्ये गरीब, कष्टकरी, कामगार व हमाल वर्गातील मुला-मुलींना शिक्षण दिले जाते.
अलीकडेच सांगलीतीलच शिक्षण संस्थेतून शिक्षण घेऊन मुंबई महानगरपालिका आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारलेल्या मा. अश्विनी भिडे या कुपवाड परिसरातील विद्यार्थिनी असल्याने सांगली व कुपवाड परिसरातील नागरिक, विशेषतः मुलींमध्ये आनंद व अभिमानाचे वातावरण आहे.
अशा परिस्थितीत सांगली महानगरपालिकेच्या आयुक्त व कर्मचाऱ्यांनी सौ. आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल, कुपवाड या मुलींच्या शाळेत वर्ग व परीक्षा सुरू असताना अचानक प्रवेश करून शिक्षण घेत असलेल्या व परीक्षा देत असलेल्या मुलींना वर्गातून बाहेर काढले. तसेच वर्गखोल्यांना कुलूप लावून त्या सीलबंद करण्यात आल्या. महानगरपालिकेचा कर वसूल न झाल्याचे कारण पुढे करून संबंधित मिळकतीचा लिलाव करण्याच्या धमक्या देण्यात आल्या. या प्रकारामुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणात गंभीर अडथळा निर्माण झाला.
या प्रकरणी शिक्षण संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच समोर सुप्रसिद्ध वकील अॅड. अभिषेक फणसे व त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत रिट याचिका दाखल केली. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत सर्व शाळा तात्काळ खुल्या करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढील आदेश येईपर्यंत महानगरपालिकेने शाळा किंवा शिक्षण संस्थेविरुद्ध कोणतीही बळजबरीची कारवाई करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.