नांदेड :- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या संचालन (ऑपरेटिंग) विभागाने आर्थिक वर्ष २०२५–२६ दरम्यान कार्यक्षम संचालन, वेळेचे पालन आणि प्रवासी सुविधांमध्ये लक्षणीय प्रगती साधली आहे. विभागाने वेळेची अचूकता, वहन क्षमता वाढ आणि प्रवाशांच्या सोयीसुविधा सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
संचालन कामगिरी
या वर्षात वेळेच्या अचूकतेत मोठी सुधारणा नोंदविण्यात आली आहे. मेल/एक्सप्रेस गाड्यांनी ३९ वेळा १००% समयपालन साध्य केले असून, मागील वर्षी ही संख्या ४ वेळा होती. प्रवासी गाड्यांनी ४८ दिवस १००% समयपालन नोंदविले, जे मागील वर्षी २३ दिवस होते. तसेच मेल/एक्सप्रेस व प्रवासी गाड्यांनी मिळून १२ दिवस १००% समयपालन साध्य केले, तर मागील वर्षी हे केवळ १ दिवस होते.
याशिवाय संचालन कार्यक्षमता वाढविण्यासाठी ३८६ किलोमीटर मार्गावर गाड्यांचा वेग १०० किमी प्रतितास वरून ११० किमी प्रतितासपर्यंत वाढविण्यात आला, ज्यामुळे गाड्यांची गती वाढून सेवा अधिक विश्वासार्ह झाली आहे.
प्रवासी सुविधा व उपक्रम
प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रेल्वे संपर्क वाढविण्यासाठी नांदेड विभागाने अनेक उपक्रम राबविले आहेत. वंदे भारत एक्सप्रेस सेवा २६ ऑगस्ट २०२५ पासून नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) पर्यंत विस्तारित करण्यात आली, ज्यामुळे प्रवाशांना जलद व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली.
हंगामी व सणासुदीच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी विभागाने २०२५–२६ दरम्यान ट्रेन-ऑन-डिमांड (TOD) विशेष गाड्यांचे २,४४१ फेऱ्या चालविल्या, ज्यामुळे प्रवाशांना गर्दीच्या काळातही प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली.
याशिवाय अतिरिक्त प्रवासी गर्दी कमी करण्यासाठी विविध गाड्यांमध्ये २३३ अतिरिक्त डबे जोडण्यात आले, तसेच १३ जोड्या गाड्यांमध्ये ५५ डब्यांची कायमस्वरूपी वाढ करण्यात आली, तर ३ जोड्या गाड्यांमध्ये १५ डबे तात्पुरते वाढविण्यात आले, ज्यामुळे वहन क्षमता लक्षणीय वाढली.
तसेच खालील नवीन गाड्या सुरू करण्यात आल्या :
• नांदेड – फिरोजपूर साप्ताहिक एक्सप्रेस (१५.०६.२०२५ पासून)
• काचेगुडा – भगत की कोठी – काचेगुडा एक्सप्रेस (नांदेड मार्गे) (२०.०७.२०२५ पासून)
• तिरुपती – साईनगर शिर्डी – तिरुपती एक्सप्रेस (नांदेड मार्गे) (१४.१२.२०२५ पासून)
ही सर्व कामगिरी नांदेड विभागातील संचालन विभाग व कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे साध्य झाली असून, सेवा गुणवत्ता, संचालन कार्यक्षमता आणि प्रवासी समाधान वाढविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.