नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या गणितीय शास्त्रे संकुलात ‘पारंपारिक दिवस २०२६’ व Pi Day मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. “Heritage & Hustle: Celebrating Womanhood” (वारसा आणि जिद्द : स्त्रीत्वाचा उत्सव) या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या ‘स्वयंसिद्धा’ उपक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. गणितीय शास्त्रे संकुल आणि पाय-क्लब (Pi-Club) यांच्या संयुक्त विद्यमाने असा त्रिवेणी संगम कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन होते. प्रमुख पाहुण्या म्हणून कंधारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अतिरिक्त गृह पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) डॉ. अश्विनी रामदास जगताप उपस्थित होत्या. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, विज्ञान व तंत्रज्ञान संकुलाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेसचे प्रभारी संचालक डॉ. शैलेश वढेर, आंतरिक गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी तसेच गणितीय शास्त्रे संकुलाच्या संचालिका प्रा. डॉ. रुपाली जैन व्यासपीठावर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. अशोक महाजन यांनी राष्ट्रनिर्मितीत महिलांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. भारताची संस्कृती आणि परंपरेचा खरा वारसा महिलांच्या कर्तृत्वातून प्रकट होत असल्याचे त्यांनी नमूद केले. आधुनिक युगात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली असून सांस्कृतिक वारशाचे भान राखत पुढे जाण्याची प्रेरणा या उपक्रमातून मिळते, असे ते म्हणाले.
प्रमुख पाहुण्या डॉ. अश्विनी रामदास जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महिलांचे समाजातील वाढते योगदान, शिक्षणाचे महत्त्व आणि आत्मविश्वासाच्या बळावर महिलांनी विविध क्षेत्रांत मिळवलेले यश यावर प्रकाश टाकला. आधुनिक काळात महिलांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते, मात्र कुटुंब आणि समाजाच्या पाठबळामुळे त्या अधिक सक्षमपणे पुढे जातात, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. डॉ. रुपाली जैन यांनी “Heritage & Hustle” या संकल्पनेचे स्पष्टीकरण करताना स्त्री-पुरुष समानता ही स्पर्धा नसून परस्पर सहकार्य आणि आदर यावर आधारित असल्याचे सांगितले. पुरुष आणि महिला एकमेकांच्या पूरक ठरून कार्य केल्यास समाजाच्या प्रगतीला नवे बळ मिळते, असे त्यांनी नमूद केले.
प्रभारी कुलसचिव डॉ. डी. डी. पवार यांनी आपल्या मनोगतात आईच्या संघर्ष आणि त्यागाचा उल्लेख करत महिलांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. महिला सक्षमीकरणाची सुरुवात घरातूनच व्हायला हवी, असे त्यांनी सांगितले. विज्ञान व तंत्रज्ञान संकुलाचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करत परंपरा आणि महिला सक्षमीकरणाचा सुंदर संगम या कार्यक्रमातून साधल्याचे सांगितले.
इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेसचे संचालक डॉ. शैलेश वढेर यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवत प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. निकिता गुमटे आणि श्री. बसवेश्वर राचेवाड यांनी केले. विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा, सांस्कृतिक सादरीकरणे तसेच विविध उपक्रमांद्वारे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले. तसेच Pi Day निमित्त गणित विषयाशी संबंधित विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणितीय शास्त्रे संकुलातील प्राध्यापक डॉ. अणिकेत मुळे, डॉ. नितीन दरकुंडे, डॉ. उषा सांगळे, श्री. उदय दिवेवार यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी यांनी उपस्थितांचे आभार मानले.