नांदेड :- केंद्र व राज्य शासनाकडून समाजातील सर्व घटकांचा विचार करून विविध कल्याणकारी योजना राबविण्यावर नेहमीच भर आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी, रोजगार, आरोग्य यासह सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. विकसित भारत 2047 अनुषंगाने वाटचाल करुन सर्वांगीण विकास व जनकल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.
महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिनानिमित्त आज नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते नांदेड येथील पोलीस कवायत मैदानावर सकाळी 8 वा. ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, महापौर कविता मुळे, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर अन्य वरिष्ठ अधिकारी आणि ज्येष्ठ सन्माननीय नागरिक तसेच स्वातंत्र सैनिक व त्यांचे कुटुंबियांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. ध्वजवंदनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर पालकमंत्री अतुल सावे यांनी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारस पत्नींची भेट घेतली. पालकमंत्र्यांसोबत जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
देशात जनगणना 2027 चा पहिला टप्पा आजपासून सुरू झाला आहे. या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत स्व-गणना 1 ते 15 मे 2026 या कालावधीत होणार असून, घरांची नोंदणी 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या महत्त्वाच्या अभियानात सहभागी होऊन आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.
यंदाचा ‘अर्थसंकल्प' हा विकसित महाराष्ट्राच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि दूरदर्शी पाऊल आहे. हा अर्थसंकल्प राज्याच्या शेतकरी, महिला, युवक, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिकांना समर्पित आहे. विशेषत: शेतकरी कल्याणाला प्राधान्य देत हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या जीवनात खरा बदल घडवणारा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत रुपये 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची मोठी घोषणा शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देणारी आहे असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या सूक्ष्म व प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्ह्याला प्रधानमंत्री पिक विमा योजना (खरीप हंगाम 2025-26) अंतर्गत 813 कोटी रुपयांचा पिक विमा मंजूर झाला असून, लाभार्थ्यांना विमा रकमेचे वितरण सुरू आहे. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात उष्णतेची लाट (हिट वेव्ह) निर्माण झाली आहे. सर्व नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक ती काळजी घ्यावी. दुपारी 12 ते 4 या वेळेत कष्टाची कामे टाळावीत. तसेच उष्माघाताची लक्षणे दिसताच तातडीने उपचार घ्यावेत असे आवाहन पालकमंत्री सावे यांनी केले.
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 2026 च्या मान्सूनवर 'एल-निनो' (El-Nino) या हवामान घटकाचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पशुधनाच्या संरक्षणासाठी व संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी 'जिल्हा चारा सुरक्षा आराखडा' तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिराच्या माध्यमातून विविध विभागाच्या योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात येत आहे याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार नागेश देवराव कंकाळ, नागरी हक्क संरक्षण विभागाचे लिंगुराम बळीराम पोकलवार व महिला पोलीस शिपाई जयश्री विठ्ठल मुरकुटे यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निवड झालेले आदर्श ग्राम महसूल अधिकारी माधव कोंडजी पाटील यांना 5 हजार रुपयांचा धनादेश व प्रशस्तीपत्र देवून सन्मान केला. महिला व बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या समाजसेविकांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार सुरेखा किनगावकर, अर्चना झाडबुके यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. जिल्हास्तरीय युवक-युवती पुरस्कार लवकुश मधुकर जाधव व साधना कैलास गायकवाड यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र पांडागळे व श्रीमती अंजली नातु यांनी केले.
जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकाने सुरवातीला वंदे मातरम गीताचे व राष्ट्रगीतासह राज्यगीत सादर केले. यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना व राष्ट्रगीतानंतर पालकमंत्री अतुल सावे यांनी संचलन करणाऱ्या पथकाचे पोलीस वाहनातून निरीक्षक केले. परेड कमांडर वैभव पडवळ, सेंकड इन कमांडर विजय कुमार धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलनात जलद प्रतिसाद दल, सशस्त्र पोलीस पुरुष पथक, सशस्त्र महिला पोलीस पथक, गृहरक्षक दलाचे पुरूष व महिला पथक, गृहरक्षक दल पुरुष पथक, राष्ट्रीय छात्रसेना, अग्नीशमन दलाचे पथक, पोलीस वाद्य पथक, डॉग स्काड युनिट, बॉम्ब शोधक व नाशक पथक,सर्व्हिलेन्स वाहन, फोरेसिक वाहन, रुग्णवाहिका 108, अग्निशामक वाहन देवदूत यांचा पथसंचलनात सहभाग होता.
तत्पूर्वी महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ध्वजवंदन करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.