जामखेड | प्रतिनिधी
जामखेड शहरात प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून एका माथेफिरू तरुणाने नृत्यांगनेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. “माझा नंबर का ब्लॉक केला?” असा जाब विचारत आरोपीने महिलेवर सपासप वार केले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी घटनेनंतर फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री तुषार सावंत (वय २६) ही नृत्यांगना जामखेड शहरातील तपनेश्वर गल्ली परिसरात आपल्या मैत्रिणीसोबत वास्तव्यास आहे. आरोपी राहुल अशोक कचरे (रा. खळेगाव, जि. बीड) याच्याशी तिचे मागील पाच वर्षांपासून मैत्रीचे व प्रेमाचे संबंध होते. मात्र, २०२४ पासून गायत्रीने त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडले होते. यापूर्वीही आरोपीकडून त्रास होत असल्याने गायत्रीने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
मध्यरात्री खोलीत घुसून हल्ला
शुक्रवारी (६ फेब्रुवारी) मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास, गायत्रीची मैत्रीण काही कामासाठी रूमबाहेर गेली असताना दबा धरून बसलेल्या राहुलने अचानक खोलीत प्रवेश केला. त्याच्या हातात धारदार कोयता होता. “तू माझ्याशी का बोलत नाहीस? माझा नंबर का ब्लॉक केला?” असे म्हणत त्याने गायत्रीवर कोयत्याने सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे गायत्री गंभीर जखमी झाली.
धमकी देऊन आरोपीचा पलायन
घटनेदरम्यान गायत्रीची मैत्रीण मनीषा जावळे हिने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिलाही जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमी गायत्रीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
गुन्हा दाखल; पोलिसांचा शोध सुरू
या प्रकरणी गायत्री सावंत हिने दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात राहुल अशोक कचरे याच्याविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी घटनेनंतर फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव करत आहेत. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
या घटनेमुळे जामखेड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न