खर्डा चौकात हेड कॉन्स्टेबलला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल दुकाचीवरुन सहकाऱ्यासह एका गुन्ह्याचा पंचनामा करून परत येत असताना युवकांनी दिली धडक

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 06/02/2026 2:34 PM

जामखेड : जामखेड शहरातील खर्डा चौक येथे जामखेड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हेड कॉन्स्टेबल संजय लोखंडे यांना मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी दोन युवकांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.


पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेड कॉन्स्टेबल संजय लोखंडे हे सहकाऱ्यासह एका गुन्ह्याचा पंचनामा करून दुचाकीवरून पोलीस ठाण्याकडे परतत होते. यावेळी खर्डा चौकात मागून आलेल्या एका दुचाकीस्वाराने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. संबंधित दुचाकीस्वार मोबाईल फोनवर बोलत असल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांनी त्याला वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत समजावण्याचा प्रयत्न केला.

यावेळी वाद निर्माण झाला. वाद वाढत जाऊन संबंधित युवकांनी हेड कॉन्स्टेबल लोखंडे यांच्याशी धक्काबुक्की केली आणि मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकारामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी शाहनवाज शफीक सय्यद (वय २४) व जिशान शफीक सय्यद (वय २२), रा. टाटा टॉवर गल्ली, जामखेड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर दोघांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पुढील तपास जामखेड पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

या घटनेमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा सुरू झाली आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर अशा प्रकारे हल्ला होणे ही गंभीर बाब असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे. अशा प्रकारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

पोलिसांच्या कामाच्या पद्धतीवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले

खर्डा चौकातील घटनेनंतर शहरात केवळ मारहाणीची चर्चा न राहता पोलिसांच्या कामकाजाच्या पद्धतीबाबतही नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत. काही नागरिकांचे मत आहे की, वाहतूक नियमांची अंमलबजावणी, सार्वजनिक ठिकाणी गस्त, तसेच वादग्रस्त प्रसंग हाताळण्याची पद्धत याबाबत अधिक प्रभावी उपाययोजना आवश्यक आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या