सांगली, ता. १५ ः कवलापूर विमानतळाच्या १६५ एकर क्षेत्रालगत काही भूखंड विक्री केली जात आहे. काही बांधकामे केली जात आहेत. ती तात्काळ थांबवावीत. जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबत नोटीस जारी करावी, अशी मागणी विमानतळ बचाव कृती समितीच्या बैठकीत आज करण्यात आली. या प्रश्नावर गुरुवारी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची भेट घेण्याचे ठरले.
कृती समितीचे निमंत्रक पृथ्वीराज पवार यांच्यासह माजी आमदार नितीन शिंदे, सतीश साखळकर, माजी नगरसेवक हणमंत पवार, संतोष पाटील, डॉ. संजय पाटील, हमाल पंचायतचे विकास मगदूम, नितीन चव्हाण, शिवसेनेचे शंभुराज काटकर,शुभम चव्हाण,गजानन साळुंखे ,आनंद देसाई,युसूफ उर्फ लालू मिस्त्री,पिंटू कर्वेकर विजय साळुंखे, शुभम चव्हाण यांनी विमानतळाच्या जागेची स्थळ पाहणी केली. त्याआधी पंचमुखी मारुती रस्त्यावरील कष्टकऱ्यांची दौलत येथे बैठक झाली. तीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने विमानतळासंदर्भात सुरु असलेल्या प्रयत्नांबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या जागेचा बाजार रोखून तेथे विमानतळाला सकारात्मकता दाखवल्याने सांगलीच्या विकासाला गती येईल, अशी भावना व्यक्त करण्यात आली. या ठिकाणी काहींचा अजूनही प्लॉट पाडून जागा हडपण्याचा प्रयत्न असेल तर तो ओळखून सांगलीकरांनी सावध राहिले पाहिजे, अशी सूचनादेखील करण्यात आली.
कवलापूर विमानतळाच्या जागेवरील पाहणीत काही ठिकाणी भूखंड विकसीत करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे चित्र समोर आले. विमानतळाच्या मूळ जागेपासून काही अंतरावर हे काम सुरु आहे. शिवाय, काही ठिकाणी बांधकामे केली जात आहेत. त्याचा उद्देश विमानतळाला बाधा आणण्याचा आहे का, हे तपासून घेतले पाहिजे, असे मत नितीन शिंदे आणि पृथ्वीराज पवार यांनी व्यक्त केले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने संबंधितांनी नोटीस बजावली पाहिजे, अशी मागणी सतीश साखळकर यांनी केली.
नितीन शिंदे म्हणाले, ‘‘विमानतळाची जागा हडपण्याचा प्रयत्न सांगलीकरांना हाणून पाडला. आता विमानतळ उभे करण्याचे लक्ष्य साध्य केल्याशिवाय गप्प बसायचे नाही. सरकारने योग्य दिशेने पावले उचलली आहेत. त्यामुळे अपेक्षा वाढल्या आहेत. आता कोणत्याही कारणाने माघार घेऊ नये. येथे विमानतळ होणे म्हणजेच सांगलीच्या विकासाला योग्य दिशा मिळणे, हे स्पष्ट आहे.’’
पृथ्वीराज पवार म्हणाले, ‘‘सांगलीचे बलस्थान शेती, शेतमाल, शेतमाल प्रक्रिया आहे. त्यामुळे या ठिकाणी कार्गो विमानतळ झाले पाहिजे. त्यादृष्टीने आवश्यक जमित अधिग्रहित व्हावी. कवलापूर, बुधगावचे शेतकरी या विकास प्रक्रियेला निश्चितपणे साथ देतील. आम्ही त्यासाठी पुढाकार घेऊ. हा सांगलीच्या विकासाची नवी सुरवात ठरेल.’’
सतीश साखळकर म्हणाले, ‘‘जिल्हा प्रशासनाने तातडीने या जमिनीभोवतीची पाहणी करून अतिक्रमण, बांधकाम होणार नाही, याची काळजी घ्यावी. याबाबत त्यांची भेट घेऊन विनंती करू.’’
---------
कृती समितीला स्थान द्या
कवलापूर विमानतळासंदर्भातील ज्या बैठका राज्य शासनाच्या पातळीवर सुरु आहेत, त्यात कृती समिती सदस्यांना निमंत्रित करावे, अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली. विमानतळाची जागा वाचवली गेली. कृती समितीने त्यावर अभ्यास केला. पृथ्वीराज पवार, सतीश साखळकर समितीची बाजू मांडतील, शिवाय सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये विश्वासू दुवा म्हणूनदेखील समिती काम करेल, असे त्यांनी सांगितले.