विक्रेत्यांना नियमांचे पालन बंधनकारक; ट्रॅफिक, पार्किंग, स्वच्छता व सुरक्षा उपाययोजनांवर महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सांगली महानगरपालिकेमध्ये *आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली* आज (दि. १३/१०/२०२५) एक विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत सर्व संबंधित विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी *व्यापारी, विक्रेते, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना इत्यादींच्या सूचना ऐकून घेऊन* महत्त्वाचे निर्णय घेतले.
बैठकीस उपस्थिती:
बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्री. राहुल रोकडे, उपाधीक्षक श्री. प्रणिल गिल्डा, शहर पोलीस निरीक्षक श्री. संजय मोरे, वाहतूक नियंत्रण पोलीस निरीक्षक श्री. मुकुंद कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुनील गिड्डे, सहाय्यक आयुक्त श्री. आकाश डोईफोडे, कार्यकारी अभियंता (विद्युत) श्री. अमर चव्हाण, उपअभियंता (बांधकाम) श्री. महेश मदने, अभियंता श्री. ऋतुराज यादव, स्वच्छता अधिकारी श्री. सचिन सागावकर, अतिक्रमण अधीक्षक श्री. नागार्जुन मद्रासी सर्व स्वच्छता निरीक्षक, लोकप्रतिनिधी, व्यापारी, विक्रेते,उपस्थित होते.
👉 बैठकीत घेतलेले महत्त्वाचे निर्णय:
१. विक्रेत्यांसाठी नियमावली:
•दत्त मारुती चौक ते बालाजी चौक या रस्त्यावरील दोन्ही बाजूस विक्रीसाठी पट्टे आखण्यात आले आहेत.विक्रेत्यांनी महानगरपालिकेने आखून दिलेल्या पट्ट्याच्या आतच विक्री करावी आणि त्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा ते जप्त केले जाईल.
• लक्ष्मीपूजन साहित्य, रांगोळी, पणती व किरकोळ वस्तू विक्रेत्यांसाठी नवसंदेश बोळाशेजारी, तरुण भारत कॉर्नर ते आनंद टॉकीज चौक व आनंद टॉकीज चौक रिक्षा स्टॉप ते कृष्णामाई रोड येथे व्यवस्था करण्यात आली आहे. तेथेच त्यांनी विक्री करावी.
• फटाके विक्रेत्यांची व्यवस्था तरुण भारत स्टेडियम, सांगली येथे करण्यात आली आहे.
२. वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थापन:
• नवसंदेश बोळ - मैत्रिण कॉर्नर एक नंबर चौक - तानाजी चौक हा रस्ता वाहतुकीसाठी रिकामा ठेवण्यात येईल.
• भारती विद्यापीठ ते मदनभाऊ व्यापारी संकुल समोरील रस्ता वाहतुकीसाठी रिकामा राहील.
• पार्किंगची विशेष व्यवस्था जयश्री टॉकीज मागे, जनावर बाजार, वैरण अड्डा व राजवाडा परिसरात करण्यात आली आहे.
• नागरिकांनी खरेदीसाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करावा आणि बाजारपेठेत चारचाकी वाहने आणणे टाळावे. नेमून दिलेल्या पार्किंगच्या जागीच वाहने पार्किंग करावीत.
३. व्यापारी आणि स्वच्छतेसाठी सूचना:
• व्यापाऱ्यांनी दुकानासमोरील लोखंडी पायरी महानगरपालिकेने आखून दिलेल्या पट्ट्याच्या आतच ठेवावी व तिचा आकार २ फूटांपेक्षा अधिक नसावा.
• दुकानदार व त्यांचे कामगार यांनी आपली वाहने जनावर बाजार, वैरण अड्डा, जयश्री टॉकीज मागे या ठिकाणी पार्क करावीत, जेणेकरून ग्राहकांची वाहने तेथे पार्किंग करता येतील.
• व्यापाऱ्यांनी दुकानातील कचरा घंटागाडी किंवा जवळच्या कचरा कंटेनरमध्येच टाकावा.
४. आपत्कालीन सुविधा:
• कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाचा क्रमांक ११२ वर संपर्क साधावा.
फटाके स्टॉल करिता कल्पद्रुम ग्राउंड, नेमिनाथ नगर, राजमती भवन शेजारी, विश्राम बाग, सांगली येथे ही व्यवस्था करण्यात आली आहे, याचा देखिल समावेश करण्यात यावा..
महानगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, दिवाळी सणाचा आनंद घेताना स्वच्छता, सुरक्षा व शिस्त राखून प्रशासनास सहकार्य करावे.