पोंभुर्णा तालुक्यात 40 हजार कोटींचा उद्योग उभारणार – मुनगंटीवार
सुधीर मुनगंटीवार यांचा वचननामा प्रसिद्धरोजगार, आरोग्य, कृषी, शिक्षण, पायाभूत सुविधा या क्षेत्राच्या विकासाची पंचसूत्री
चंद्रपूर: बल्लारपूर विधानसभा मतदार संघात आजवर विकासाची अभूतपूर्व अशी कामे केली असून या पुढेही रोजगार, आरोग्य, कृषी, शिक्षण, पायाभूत सुविधा या क्षेत्रात भरीव काम करण्याचा संकल्प व्यक्त करत पोंभुर्णा तालुक्यात ४० हजार कोटींचा उद्योग उभारण्याचा निर्धार भाजपा महायुतीचे बल्लारपूर क्षेत्राचे उमेदवार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केला असून, यासाठी मतदार बांधवांनी पुनःश्च सेवेची संधी द्यावी असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीनिमित्त बल्लारपूर मतदार संघासाठी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या वचननाम्यात शैक्षणिक क्षेत्रातही भरीव काम करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
वचननाम्यातील ठळक बाबींमध्ये प्रत्येक पंचायत समिती क्षेत्रामध्ये मॉडेल शाळा बनविणे, मुलींसाठी कौशल्यावर आधारित रोजगार निर्मिती करण्यास मदत करणारे अभ्यासक्रम एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या माध्यमातून राबविणे,गावागावात डिजिटल वाचनालय तयार करून स्पर्धा परीक्षेसाठी ऑनलाईन क्लासेस घेणे,प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेत पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे, जिल्ह्यातील संपूर्ण आय.टी.आय. मॉडेल करणे, मुल येथे शासकीय पॉलीटेक्निक कॉलेज सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. रोजगार निर्मिती व उद्योग क्षेत्रासाठी देखील काही महत्वपूर्ण संकल्प त्यांनी केले आहेत.
पोंभुर्णा तालुक्यात ४० हजार कोटींचा उद्योग निर्माण करण्याची महत्वपूर्ण घोषणा त्यांनी केली आहे. बल्लारपूर, मूल, पोंभुर्णा येथे स्वतंत्र रोजगार केंद्र स्थापन करणे, जिल्ह्यातील रोजगार व उद्योगात स्थानिक युवा-युवतींना प्राधान्य देणे,प्रत्येक तालुक्यातील एम. आय. डी. सी. मध्ये प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे,डब्ल्यू. सी. एल. च्या माध्यमातून वोल्वो प्रशिक्षण उपलब्ध करून देणे,वेकोलि मधील प्रकल्प ग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी यंत्रणा उभी करणे, आदिवासी तरुण तरुणीसाठी विशेष औद्योगिक वसाहत स्थापन करणे he संकल्प त्यांनी जाहीर केले आहेत.
आरोग्याच्या क्षेत्रात देखील महत्वपूर्ण संकल्प !
बल्लारपूर, मूल, पोंभुर्णा तालुक्यात फिरते रुग्णालय तयार करणे,चारही तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी नियमित आरोग्य शिबिर आयोजित करणे,नेत्र चिकित्सा शिबीर नियमितपणे आयोजित करणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून देण्यात येणारी आरोग्य सेवा उत्तम करणे, आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत विविध आरोग्य शिबिरे आयोजित करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध आरोग्य शिबिरे आयोजित करून मोतीबिंदूचे ऑपरेशन करणे,भारतीय जन परिवार योजनेच्या अंतर्गत जेनेरिक औषधी च्या माध्यमातून जन औषधी केंद्र उभारणे हे संकल्प आरोग्य क्षेत्रासाठी केले आहेत.
वन जमिनीचे पट्टे वाटप प्रधान्याने करणार
वनविभागाशी संबंधित वन जमिनीचे पट्टे वाटप करणे,जंगलालगत गावांमध्ये पर्यटन पूरक रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देणे, वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करणे, महसूल जमिनीसंबंधी गावांमधील घरांचे प्रश्न मार्गी लावणे, विविध अतिक्रमण धारकांना पट्टे देणे, वन जमीन पट्टे, दावे तात्काळ निकाली काढणे हे संकल्प त्यांनी केले आहेत.
शेतकरी व बचत गटातील महिलांसाठी आधुनिक बाजारपेठ
शेती तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे काही महत्वपूर्ण संकल्प यात आहेत.शेतकरी व बचत गटातील महिलांसाठी आधुनिक बाजार पेठ (मॉल) उभारणे,धान क्लस्टरची स्थापना करून त्यावर आधारित उद्योग उभारणीला चालना देणे,मामा तलावांचे खोलीकरण व नूतनीकरण करून मासेमारी उद्योगाला प्रोत्साहन देणे,मामा तलावांना जोडणाऱ्या पाण्याच्या स्त्रोतांना पुनर्जीवित करून बारमाही पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणे,मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या शेत शिवारातील पाणंद रस्ते गावागावात तयार करणे,शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग स्थानिक एमआयडीसीमध्ये सहभागी करणे,शेतकऱ्यांना शेती उपयोगी कामासाठी मजूर उपलब्ध करण्याची योजना राबवणे, देशी गोवंश पालन कर्त्यांना अनुदान व चारा उपलब्ध करून देण्याची सोय करणे,भाजीपाला उद्योजक शेतकऱ्यांसाठी क्लस्टर तयार करणे,डेअरी क्लस्टर ची स्थापना करून दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे,शेतकऱ्यांसाठी दरवर्षी कृषी महोत्सवाचे आयोजन करणे या संकल्पांcha समावेश आहे.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय वसतिगृहे तयार करणे,शैक्षणिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याकरिता बिनव्याजी कर्जाची व्यवस्था करणे,ओबीसी साठी घरकुल योजनांच्या अनुदानामध्ये वाढ करणे, शासनमान्य सैनिक शाळेमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी प्रयत्न करणे हे संकल्प ओबीसी साठी जाहीर केले आहेत.
पायाभूत सोयी सुविधा क्षेत्रात केंद्र व राज्य शासनाच्या योजना घरोघरी पोचवण्यासाठी १०० विकासदूत नेमणे,संपूर्ण मतदारसंघात फिरते जनसंपर्क कार्यालय तयार करणे, दर तीन महिन्याने मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार आयोजित करणे, मुल बल्लारपूर बायपास रस्त्याचे बांधकाम करणे,जमिनीचे अधिकाधिक पट्टे वाटप करण्याचा प्रयत्न करणे,रेल्वे च्या जागेवारील घरांचे पुनर्वसन करणे,सर्व तालुक्यातील ग्रामपंचायत इमारती अद्ययावत करणे, संपूर्ण मतदारसंघात शंभर टक्के पात्र लाभार्थ्यांना घरकुल वितरित करणे हे संकल्प सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे.
आजवर विकासासंबंधी नागरिकांना दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न मी केला आहे. भविष्यात देखील आपला हाच प्रयत्न राहणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी वचननाम्यात म्हटले आहे.