आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
*- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी*
सातारा दि.: मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमुळे सुशिक्षीत बेरोजगारांना सहा महिन्यांसाठी रोजगार उपलब्ध होणार आहे. शासकीय विभागांबरोबर खासगी संस्थांमध्येही या योजनेंतर्गत मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. विविध यंत्रणांनी मनुष्यबळाची जास्तीत जास्त मागणी करुन योजना यशस्वी राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी श्री. डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला उपवनसंरक्षक आदिती भरद्वाज, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी सुनिल पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून खासगी क्षेत्रातील आस्थापना व उद्योगांमध्ये 10 टक्के तर सेवा क्षेत्रातील आस्थापना व उद्योगांमध्ये 20 टक्के पदे भरता येणार आहेत. जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे मनुष्य उपलब्धतेबाबत तातडीने मागणी करावी. जिल्ह्यात बँकांची संख्या जास्त आहे, यामध्ये मनुष्यबळाची मागणी करावी. शिक्षण विभागानेही जिल्ह्यातील महाविद्यालयांची मागणी घेऊन गरजेनुसार सुशिक्षीत बेरोजगारांना नियुक्त्या द्याव्यात. 12 वी पास प्रशिक्षणार्थींना 6 हजार, आयटीआय/पदविका प्रशिक्षणार्थींना 8 हजार आणि पदवीधर/पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना 10 हजार प्रतिमाह विद्यावेतन 6 महिन्यांपर्यंत मिळणार आहे. सहायक कामगार आयुक्त कार्यालय व जिल्हा उद्योग केंद्राने उद्योगांशी संपर्क साधून जास्तीत जास्त मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत सुशिक्षीत बरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केल्या.