नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. यासाठी अंतिम तारीख 13 सप्टेंबर आहे. यासाठी फक्त ऑनलाईनच अर्ज स्वीकारला जाणार आहे. कोणत्याही कार्यालयात ऑफलाईन अर्ज देऊ नये असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
योजनादूत उपक्रमाला नांदेड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी यामध्ये 5331 युवकांनी अर्ज ऑनलाईन सादर केले आहेत. तथापि, जिल्ह्यातील काही युवकांना मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना व मुख्यमंत्री योजना दूत योजना यामध्ये गोंधळ करुन घेऊ नये. दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतून नियुक्त झालेल्या उमेदवारांनाच मुख्यमंत्री योजना दूत योजनेतील नियुक्ती समजली जात आहे. युवकांनी हा गोंधळ करू नये, अद्याप मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाची निवड प्रक्रिया सुरू आहे ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 13 सप्टेंबर आहे.
ऑफलाइन अर्जाची गरज नाही
योजनादूत कार्यक्रमासाठी कोणत्याही ऑफलाइन अर्जाची अर्थात दस्ताऐवज जोडलेला अर्ज प्रत्यक्ष करण्याची गरज नाही. यासाठी ऑनलाइन अर्ज www.mahayojanadoot.org या वेबसाईटवर करायचा आहे. एकदा अर्ज केल्यानंतर कोणतीही सूचना, बदल, तक्रार करायची असल्यास त्यासाठी विद्यार्थ्यांनी इन्फो ॲट द रेट महायोजनादूत डॉट इन (
[email protected] ) या ईमेलवर मेल करावा यासाठी कोणत्याही कार्यालयाच्या भेटीची गरज नाही. कोणत्याही अधिकाऱ्याला संपर्क साधण्याची गरज नाही.
साईट स्लो असल्यास पुन्हा प्रयत्न करा
अनेक विद्यार्थी अर्ज सादर करण्यासाठी गेल्यानंतर सदर साईट स्लो झाली असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र 13 सप्टेंबर पर्यंत येणारे सर्व अर्ज स्वीकारले जाणार आहे. घाई न करता आरामात सर्वांनी आपले अर्ज भरावे. साईट बंद करण्यात आलेली नाही. अथवा त्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही. या संदर्भातील कुठेही तक्रार असल्यास वरील ई-मेलवर तक्रार करावी असेही आवाहन करण्यात आले आहे.
१३ सप्टेंबर अखेरची तारीख
७ सप्टेंबर २०२४ पासून या उपक्रमासाठी नोंदणी सुरु झाली असून येत्या १३ सप्टेंबरपर्यंत www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
५० हजार योजनादूत
. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.
*असे आहेत निवडीचे निकष*
या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.
*ही कागदपत्रे आवश्यक*
मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. त्याशिवाय या योजनेबाबत वेळोवेळी वृत्तपत्रात देण्यात येणाऱ्या सूचनांकडे उमेदवारांनी लक्ष ठेवावे असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.