डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिशन थायरॉईड अभियानास प्रारंभ

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 31/03/2023 12:41 PM

नांदेड :- वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाअंतर्गत रुग्णसेवेसाठी व विविध रोगांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी विविध अभियान सुरु केले आहेत. राज्यात 30 मार्च 2023 पासून “मिशन थायरॉईड अभियान” राबविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. त्याच अनुषंगाने आज 30 मार्च रोजी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिशन थायरॉईड अभियानाची सुरुवात करण्यात आली.

या अभियानाचे उदघाटन पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन बियाणी यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पी.टी. जमदाडे हे होते. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी.एस.बोडके, विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र डॉ. डी.पी.भुरके, विभागप्रमुख  कान नाक घसा   डॉ. विनोद कंदकुरे, विभागप्रमुख बालरोग चिकित्सा शास्त्र डॉ. किशोर राठोड, डॉ. कपिल मोरे, डॉ. व्यंकटेश खडके, डॉ. आर.डी. गाडेकर, अधिसेविका श्रीमती आपटे  तसेच या अभियानाचे नोडल अधिकारी डॉ.उबेद खान व डॉ. अतिश गुजराथी हे उपस्थित होते.

साधारणपणे प्रत्येकी 1 लाख महिलांमागे अंदाजे 2 हजार महिलांना दृश्य स्वरुपात थायरॉईडची गाठ मानेवर दिसून येते. त्याचप्रमाणे अनेक महिलांना थायरॉईडची गाठ मानेवर दिसत नसताना देखील विविध थायरॉईडचे आजार झालेले आहेत. त्यातील बऱ्याच थायरॉईडच्या आजारांचे दीर्घकाळापर्यंत निदान देखील होत नाही. अशा सर्व महिला, पुरुष आणि बालकांनादेखील या संपूर्ण अभियानाचा फायदा होणार आहे. अनेकदा थायरॉईडच्या रोगांनी ग्रस्त महिला आणि पुरुषांना आळस, सुस्तपणा, शरीरावर सुज येणे, भूक न लागता देखील वजन वाढणे, आवाजात एक प्रकारचा जाडपणा अथवा घोगरेपणा येणे ही लक्षणे थायरॉईड ग्रंथींचे काम मंदावल्याचे दर्शवितात. अनेकदा अशा महिलांना वारंवार गर्भपाताला सामोरे जावे लागते. नवजात बालकांमध्ये थायरॉईड ग्रंथीच्या स्त्रावा अभावी मानसिक दुर्बल्य येऊन अशी बालके लहान खुरी व मंदबुध्दी होऊ शकतात. थायरॉईड ग्रंथींच्या  अतिस्त्राव यामुळे अतिजास्त रोडपणा, छाती धडधड करणे व क्वचित प्रसंगी डोळे बाहेर येणे अथवा अंधत्वदेखील येऊ शकते.

मिशन  थायरॉईड या अभियानाचे उद्दिष्ट थॉयराईड रोगासंदर्भात जनजागृती करणे व त्यासंबधात सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये थायरॉईड उपचारांसाठी विविध सोयी उपलब्ध करुन देणे हा आहे. डॉ.  शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे  दर गुरुवारी दुपारी 12 ते 2 च्या दरम्यान ओ.पी.डी. क्रमांक 113  औषधवैद्यकशास्त्र विभागाअंतर्गत विशेष थायरॉईड ओ.पी.डी. चालविली जाणार असून त्यामध्ये फिजीशियन, सर्जन, एनडोक्राइनोलॉजिस्ट, पॅथालॉजिस्ट, सोनोलॉजिस्ट, व बॉयोकेमिस्ट अशा विविध तज्ञांचा एकत्र समावेश राहणार आहे. थायरॉईडच्या विविध आजारांच्या औषधोपचारांची व बऱ्याच दृश्य स्वरुपातील थायरॉईडचे विविध परिणाम  जसे अन्न घेताना त्रास होणे, श्वास गुदमरणे तसेच थायरॉईडचे विविध कॅन्सर यांसंबधी शस्त्रक्रियाची सोय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
थायरॉईडच्या विविध रोगांनी ग्रस्त असलेल्या गरजू रुग्णांनी दर गुरुवारी दुपारी 12 ते 2  वाजता डॉ.  शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड  येथे ओ.पी.डी क्रमांक 113 येथे औषधवैद्यकशास्त्र विभागाअंतर्गत  थायरॉईड क्लिनिकच्या सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या