*मुलांमधे क्रीडा शिबीरातून खेळाची आवड निर्माण होईल - सचिन अडसूळ* *क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन समारंभ संपन्न*

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 21/05/2022 8:04 PM

गडचिरोली, दि.२१  कोणत्याही एका खेळात नैपुण्य निर्माण झाल्यास मुलांना आपले करियर त्यामध्ये घडविता येते. खेळातून करियर घडवत असताना नोकरीची संधीही उपलब्ध होते. आज प्रशासनात अनेक मोठ्या पदावर अधिकारी खेळातून राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदक मिळवून आपली सेवा देत आहेत. शरीर स्वस्थ होण्याबरोबरच एक आवड, एक छंद म्हणून सुद्धा या खेळांकडे पाहिले जाते. क्रिडाविषयक शिबिरांमधून लहान तरुण मुलांमध्ये खेळा विषयक निश्चितच आवड निर्माण होईल. म्हणून भविष्यात करियर घडविण्यासाठी युवकांनी वेगवेगळ्या खेळात सहभाग घेणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी उन्हाळी क्रीडा शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले. जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचा प्रचार आणि प्रसार करण्याकरीता दि.२० मे ते दि.०३ जून या कालावधीत क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन जिल्हा क्रीडा संकुल, गडचिरोली येथे करण्यात आले. प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली सचिन अडसुळ हे होते व प्रमुख उपस्थिती म्हणुन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल हे होते. अध्यक्षीय भाषणातून खेळाडूंनी शिबीराच्या माध्यमातुन उत्तम प्रकारे आपले क्रीडा कौशल्य सुधारावे व उत्कृष्ट खेळाडू बनण्याचा प्रयत्न करावा असे  मार्गदर्शन सचिन अडसूळ यांनी केले. तसेच आजच्या युगात मोबाईल गेम पासुन दुर राहुन मैदानावरील क्रीडा प्रकारावर जास्त लक्ष द्यावे असे त्यांनी यावेळी सांगितले. प्रशांत दोंदल यांनी क्रीडा संकुलातील प्रशिक्षण केंद्रांना भेट देऊन संबंधीत क्रीडा प्रकाराच्या क्रीडा मार्गदर्शकांना शिबीराबाबत महत्त्वाच्या सुचना यावेळी दिल्या.

उद्घाटनाप्रसंगी खो-खो खेळाचे क्रीडा मार्गदर्शक मंगेश मैदूरकर व प्रविण बारसागडे, व्हॉलीबॉलचे क्रीडा मार्गदर्शक घनश्याम वरारकर, प्रविण गावडे व चैतन्य भसारकर, सिकई मार्शल आर्टचे क्रीडा मार्गदर्शक संदिप पेदापल्ली व कुस्तीचे क्रीडा मार्गदर्शक एस.बी. बडकेलवार, चंद्रगुप्त कुणघाडकर, कृष्णा सहारे, अॅथलेटीक्सच्या मृणाली शराफ, बॉक्सिंगचे यशवंत कुरुडकर व पंकज मडावी हे उपस्थित होते. याप्रसंगी क्रीडा अधिकारी कार्यालयाचे सर्व कर्मचारी  उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन अनिल वारसागडे यांनी केले व प्रास्ताविक एस. बी. बडकेलवार यांनी केले तर आभार
प्रदर्शन यशवंत कुरुडकर यांनी केले.

Share

Other News

ताज्या बातम्या