जामखेड | प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील झिक्री येथील सरपंचावर झालेल्या जिवघेण्या हल्ल्यातील फरार आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी झिक्री ग्रामस्थांनी जामखेड–नान्नज या मुख्य रस्त्यावर जोरदार रास्तारोको आंदोलन केले. आरोपींना अटक न झाल्यास जामखेड पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी झिक्री येथे अनुदानाच्या पैशांच्या वाटपावरून वाद निर्माण झाला होता. याच कारणावरून स्थानिक तीन ते चार जणांनी बाहेरील गुंडांच्या मदतीने गावात येत दहशत माजवली आणि सरपंच दत्तात्रय साळुंखे तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेनंतर जामखेड पोलीस स्टेशनमध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, घटना घडून तब्बल एक महिना उलटूनही अद्याप फरार आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी झिक्री ग्रामस्थांनी तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.
या पार्श्वभूमीवर शनिवार, दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता झिक्री ग्रामस्थांनी संतप्त होत जामखेड–नान्नज रस्त्यावर रास्तारोको आंदोलन छेडले. आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थांसह महिलांचा देखील लक्षणीय सहभाग होता.
यावेळी बोलताना सरपंच दत्तात्रय साळुंखे म्हणाले की, संबंधित आरोपी हा झिक्री ग्रामपंचायतीमध्ये रोजगार सेवक म्हणून कार्यरत असून, योजनांचे पैसे नागरिकांकडून बेकायदेशीररीत्या उकळत होता. या भ्रष्टाचाराला विरोध केल्यानेच बाहेरील गुंडांच्या मदतीने माझ्यावर व माझ्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. एक महिना होऊनही आरोपी मोकाट फिरत असणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. दोन दिवसांत आरोपी अटक न झाल्यास जामखेड पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करण्यात येईल व तरीही कारवाई न झाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसू, असा इशारा त्यांनी दिला.
रास्तारोकोची माहिती मिळताच जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांच्या भावना समजून घेतल्या. आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात येत असून लवकरच कारवाई केली जाईल, असे ठाम आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनामुळे काही काळ जामखेड–नान्नज रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली व वाहतूक सुरळीत केली.