नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संशोधन व उद्योग क्षेत्र यांच्यात दृढ सहकार्यासंबंध (सिनर्जी) प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाचे माजी विद्यार्थी व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक (संशोधन
व विकास) डॉ. महेश कस्तुरे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आज दि.२७ डिसेंबर, २०२५ रोजी आयोजित करण्यात आले.
हा कार्यक्रम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, डॉ. पी. ए. खडके, डॉ. सी. आर. बाविस्कर तसेच वित्त व लेखा अधिकारी डॉ. पराग भालचंद्र, संगणकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ.निलेश देशमुख, डॉ. शशिकांत ढवळे यांच्या सान्निध्यात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी या उपक्रमाचे स्वागत करत, विद्यापीठातील संशोधन क्षमतेला उद्योग क्षेत्राशी जोडण्यासाठी डॉ. कस्तुरे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. उद्योग व शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य वाढल्यास संशोधन अधिक परिणामकारक व समाजोपयोगी ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
उद्बोधनात डॉ. महेश कस्तुरे यांनी विद्यापीठातील नाविन्यपूर्ण संशोधन उद्योगांच्या गरजांशी संलग्न करून प्रत्यक्ष जीवनात उपयोजन करण्याचा भविष्यदर्शी दृष्टिकोन मांडला. सध्या सुरू असलेल्या संयुक्त उपक्रमांचा आढावा घेताना, उद्योग क्षेत्रातील सुरक्षितता वाढविणारी ऑप्टिकल फायबर आधारित अमोनिया शोध प्रणाली तसेच प्रायोगिक टप्प्यातील शैवाल-आधारित
जलशुद्धीकरण तंत्रज्ञान या प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली.
स्टार्टअप निर्मिती व संशोधनासाठी निधी उपलब्धतेवर भर देत, डॉ. कस्तुरे यांनी बीपीसीएल ‘अंकुर स्टार्टअप निधी’ अंतर्गत हरित तंत्रज्ञान व सायबर सुरक्षा क्षेत्रातील योजनांची माहिती दिली. अमोनिया शोध प्रणालीवर आधारित स्टार्टअप प्रस्ताव सादर करून संशोधकांनी या निधीसाठी अर्ज करावा, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय प्राधान्यक्रमांचा उल्लेख करताना त्यांनी हरित हायड्रोजन क्षेत्रातील आव्हाने व त्यामधील व्यापक संशोधन संधी अधोरेखित केल्या. तसेच प्लास्टिक कचऱ्याचे रस्ते बांधकामासाठी उपयुक्त साहित्यामध्ये रूपांतर करणाऱ्या यशस्वी सहकार्याचे
उदाहरण देत, उद्योग–शैक्षणिक भागीदारीमुळे होणाऱ्या ठोस परिणामांवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी डॉ. कस्तुरे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संशोधन प्रकल्प प्रस्तावांच्या मूल्यमापनासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. अशा सुसंवादी भागीदारीमुळे विभागीय क्रमवारीत सुधारणा, बीपीसीएलसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपच्या संधी आणि शैक्षणिक संशोधनाचा समाजहितासाठी
प्रत्यक्ष लाभ सुनिश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे संयोजन सीआयसीएमआरआयचे संचालक डॉ. कृष्ण चैतन्य, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर तसेच आयक्यूएसीचे संचालक डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी यांनी केले.