नांदेडकरांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४० हजारहून अधिक गणेश मूर्तींचे विसर्जन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 26/09/2026 5:01 PM

नांदेड :- यंदाच्या गणेशोत्सवात नांदेडकरांनी परंपरेचे भान जपत आणि पर्यावरणाविषयीची आपली सामाजिक जबाबदारी ओळखून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आवाहनाला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. सार्वजनिक व घरगुती गणेश विसर्जनादरम्यान शहरात एकूण ४० हजार ८९७ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरकरित्या विसर्जन करण्यात आले असून, विसर्जन स्थळांवरून एकूण १५.१७६ मेट्रिक टन निर्माल्य जमा करण्यात आले आहे, अशी माहिती मनपा प्रशासना मार्फत देण्यात आली.

नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. नदीपात्र, तलाव आणि इतर नैसर्गिक जलस्त्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या सोशल मीडिया माध्यमांद्वारे, तसेच शहरातील प्रमुख चौकांमध्ये होर्डिंग्ज, बॅनर्स आणि पोस्टर्स लावून व्यापक जनजागृती करण्यात आली होती. नागरिकांनी आपले निर्माल्य गोदावरी नदीपात्रात किंवा इतर तलावांमध्ये टाकू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे सातत्याने केले जात होते.

नांदेडकरांची गैरसोय होऊ नये आणि नैसर्गिक जलस्त्रोतांचे रक्षण व्हावे, या उद्देशाने महापालिकेमार्फत शहरात ठिकठिकाणी कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात आली होती. तसेच विविध प्रभागांमध्ये घरगुती गणेश मूर्तींसाठी 'मूर्ती संकलन केंद्रे' उभारण्यात आली होती. या पर्यायी व्यवस्थेचे नागरिकांनी मनापासून स्वागत केले. मोठ्या संख्येने भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन या कृत्रिम तलावांमध्ये केले, तर अनेकांनी संकलन केंद्रांवर मूर्ती सुपूर्द करून पर्यावरण रक्षणात आपला खारीचा वाटा उचलला. विसर्जनाच्या दिवशी महापालिकेच्या स्वच्छता पथकांनी अत्यंत तत्परतेने काम करत विसर्जन स्थळांवरून तब्बल १५.१७६ मेट्रिक टन निर्माल्य गोळा केले. यामुळे नदीपात्र कचरामुक्त राहण्यास मोठी मदत झाली आहे. त्याचबरोबर पालिकेच्या यंत्रणे मार्फत शहरासोबतच ग्रामीण भागातील सुद्धा गणेश मूर्तिंचे मोठ्या प्रमाणावर विसर्जन करण्यात आले आहे.

*मनपा आयुक्तांनी मानले आभार*
नांदेड शहराला स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या महापालिकेच्या या मोहिमेला नांदेडकरांनी जे सहकार्य दिले, त्याबद्दल *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी सर्व गणेशभक्त, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, नागरिक आणि अहोरात्र काम करणाऱ्या महापालिकेच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. भविष्यातही अशाच प्रकारे नागरिकांच्या सहकार्याने नांदेड शहर पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये अग्रस्थानी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परंतु मोठ्या मूर्तिंच्या प्रतिकात्मक विसर्जनास अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे खंत व्यक्त करून पुढील वर्षी अधिक प्रयत्न करण्याचा मानस मनपा आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

*चौकट*
*विसर्जन व्यवस्थेच्या ठळक बाबी*

• पालिकेच्या ०६ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण १७ मूर्ती संकलन केंद्रामध्ये मध्ये मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

• नागरिकांनी नैसर्गिक स्त्रोतात मूर्ती विसर्जन न करता जास्तीत जास्त प्रमाणात मूर्ती दान करावे याबाबत जनजागृती करण्यात आली होती.

• क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सर्व कृत्रिम हौद व मूर्ती संकलनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी १४ निर्माल्य कलश/कंटेनरची व्यवस्था करण्यात आल्याने एकूण १५.१७६ मेट्रिक टन इतके निर्माल्य संकलन झाले.

• सर्व मूर्ती संकलन केंद्रावरील गणेश मूर्ती एकत्रित करून वाहतूक करण्यासाठी एकूण ३५ आयचर वाहने नियुक्त करण्यात आली होती त्याचप्रमाणे मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी एकूण २५ मोठ्या क्रेन स्थापित करण्यात आल्या होत्या.

• प्रत्येक विसर्जन घाटावर आवश्यक ती विद्युत रोषणाई व जीव रक्षकांची टीम तैनात करण्यात आली होती. त्याचप्रमाणे प्रत्येक विसर्जन घाटावर सफाईसाठी स्वच्छता निरीक्षकांच्या चमुसह स्वच्छता टीम सज्ज होती.

गोदावरी व आसना नदीतील पाणी प्रदुषीत होऊ नये व जलसंपत्तीचे रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून पर्यावरणपुरक कृत्रिम तलावात लहान व मध्यम आकाराचे मूर्तींचे आणि खदान व कृत्रिम तलावात मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन करुन पर्यावरणपुरक गणेशोत्सव पार पाडण्यात आला असुन सदरील विसर्जन व्यवस्था महापालिका आयुक्त आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशान्वये व अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, अतिरिक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखालील उपआयुक्त अभिजित वायकोस,नितीन गाढवे, स.अजितपालसिंघ संधु, गंगाधर ईरलोड यांच्या नियंत्रणात पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन श्री गणेश विसर्जन शांततेत पार पाडले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या