कर्तव्यावर कार्यरत रेल्वे कर्मचाऱ्यांचा सन्मान करा, रेल्वे सुरक्षा नियमांचे पालन करा: रेल्वे प्रशासनाचे जनतेला आवाहन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 10/09/2026 6:45 PM

नांदेड:-लेव्हल क्रॉसिंग गेट क्र. 53 येथे कर्तव्य बजावत असलेल्या गेटकीपरवर झालेल्या हल्ल्याचा रेल्वे प्रशासनाने तीव्र निषेध केला असून, कर्तव्यावर कार्यरत असणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा सन्मान करावा तसेच त्यांच्या कामात अडथळा आणू नये, त्यांना धमकावू नये किंवा त्यांच्यावर हल्ला करू नये, असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.

दिनांक 09/10.09.2026 च्या मध्यरात्रीच्या सुमारास, श्री. ओमप्रकाश गिरी, ट्रेक मेंटेनर, हे लेव्हल क्रॉसिंग गेट क्र. 53 येथे रात्री 23:00 ते सकाळी 07:00 वाजेपर्यंत कर्तव्यावर होते. सुमारे 02:35 वाजता, ट्रेन क्र. 17611 राज्यराणी एक्स्प्रेस जात असताना 06–07 अज्ञात व्यक्तींनी बंद असलेल्या गेटचा बूम उघडण्याचा प्रयत्न केला. गेटकीपरने त्यांना विरोध केल्यावर त्यांनी काठी आणि रेल्वे ट्रॅकवरील दगडाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला रक्तस्रावाची दुखापत झाली.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस निरीक्षक/छत्रपती संभाजीनगर आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी गेटकीपरला वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. FIR नोंदणीची प्रक्रिया सुरू असून, रेल्वे सुरक्षा बल आणि स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहे.

रेल्वे प्रशासनाने रेल्वे परिसरात होणाऱ्या अनधिकृत प्रवेश (Trespassing), असुरक्षित पद्धतीने रील बनविणे (Reel-making) तसेच इतर अनधिकृत व धोकादायक कृत्यांबाबतही चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या कृतींमुळे नागरिकांचे जीव धोक्यात येऊ शकतात तसेच रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षिततेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

रेल्वे प्रशासनाचे जनतेला आवाहन:

* कर्तव्य बजावणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणू नका, हस्तक्षेप करू नका, धमकावू नका किंवा त्यांच्यावर हल्ला करू नका.
* रेल्वेचे सुरक्षा नियम व सूचनांचे काटेकोरपणे पालन करा.
* रेल्वे ट्रॅक, यार्ड, पूल किंवा प्रतिबंधित परिसरात अनधिकृत प्रवेश करू नका.
* बंद असलेले रेल्वे फाटक ओलांडण्याचा किंवा ते उघडण्याचा प्रयत्न करू नका.
* रेल्वे परिसरात रील बनविणे, छायाचित्रण, स्टंट किंवा इतर धोकादायक कृत्ये टाळा.

रेल्वे सुरक्षा नियमांचे उल्लंघन तसेच अनधिकृत कृत्यांसाठी रेल्वे अधिनियम, 1989 आणि इतर संबंधित कायद्यांतील लागू तरतुदींनुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते. रेल्वे कर्मचाऱ्याला त्याचे अधिकृत कर्तव्य बजावताना जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करणे तसेच रेल्वे परिसरात अनधिकृत प्रवेश करणे हे रेल्वे अधिनियम, 1989 मधील लागू तरतुदींनुसार दंडनीय अपराध आहेत.

कोणतीही असुरक्षित, संशयास्पद किंवा अनधिकृत गतिविधी आढळल्यास नागरिकांनी तात्काळ रेल्वेच्या हेल्पलाइन क्रमांक 139 वर किंवा RPF कर्मचारी/संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी, जेणेकरून वेळेत प्रतिबंधात्मक किंवा कायदेशीर कारवाई करता येईल.

“रेल्वे कर्मचाऱ्यांचा सन्मान करा. रेल्वे नियमांचे पालन करा. सुरक्षित राहा. असुरक्षित कृत्यांची माहिती द्या.”

प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तसेच रेल्वे गाड्यांची सुरक्षित व सुरळीत वाहतूक कायम ठेवण्यासाठी जनतेचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या