12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत; तडजोडीने प्रकरणे निकाली काढण्याची सुवर्णसंधी;पक्षकारांनी आपापसात सामंजस्याने वाद मिटवून वेळ व पैसा वाचवावा – जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आवाहन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 09/09/2026 7:09 PM

नांदेड : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेडचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नरेंद्र ब्रह्मे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दि. 12 सप्टेंबर 2026 रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात येणार आहेत.
आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळ आणि पैशाचे महत्त्व लक्षात घेता, लोकअदालत ही प्रकरणे परस्पर संमतीने निकाली काढण्याची प्रभावी संधी आहे. न्यायालयात प्रकरणे प्रलंबित असलेल्या पक्षकारांनी आपसात तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा वेळ व खर्च वाचण्यास मदत होणार आहे. तसेच वाद दोन्ही पक्षांच्या संमतीने मिटल्यामुळे परस्पर हितसंबंध व सौहार्दाचे संबंध कायम राखण्यासही मदत होईल.
लोकअदालतीमध्ये तडजोडीने निकाली काढता येणाऱ्या प्रकरणांमध्ये तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, धनादेश अनादराची (चेक बाऊन्स) प्रकरणे, बँक व कर्जवसुलीची प्रकरणे, वारसाहक्काची प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई प्रकरणे, वाहतूक चलन, सेवा विषयक प्रकरणे, कामगार वाद, जमीन संपादन, महसूल विषयक प्रकरणे, वीज देयक, महानगरपालिका व नगरपरिषद यांची पाणीपट्टी व घरपट्टी, दूरध्वनी देयक, वैवाहिक व कौटुंबिक वाद, व्यावसायिक वाद, लवाद, ग्राहक वाद, दिवाणी प्रकरणे तसेच मध्यस्थी किंवा तडजोडयोग्य न्यायालयीन प्रकरणांचा समावेश आहे. याशिवाय दाखलपूर्व प्रकरणेदेखील लोकअदालतीमध्ये तडजोडीने निकाली काढता येणार आहेत.
पक्षकारांनी आपली प्रकरणे ज्या न्यायालयात प्रलंबित आहेत, त्या न्यायालयाच्या परिसरात प्रत्यक्ष उपस्थित राहून लोकअदालतीच्या माध्यमातून प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्याच्या या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव शरद देशपांडे यांनी केले आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड तसेच जवळच्या न्यायालयातील तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या