*सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; अमरावतीसह पाच जिल्ह्यांतील विधी पदवीधरांना मोठा दिलासा
अमरावती : अमरावती येथे ऑल इंडिया बार एक्झामिनेशन (AIBE) चे परीक्षा केंद्र उपलब्ध व्हावे, यासाठी गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. अमरावती येथे AIBE परीक्षा केंद्र उपलब्ध झाल्यामुळे अमरावतीसह अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांतील विधी पदवीधर व नवोदित वकिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वकिली व्यवसायात पुढे जाण्यासाठी महत्त्वाची असलेली AIBE परीक्षा Bar Council of India (BCI) मार्फत घेतली जाते. एलएल.बी.चे शिक्षण पूर्ण करून राज्य बार कौन्सिलमध्ये नोंदणी केलेल्या विधी पदवीधरांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची असून, Certificate of Practice (COP) प्राप्त करण्याच्या दृष्टीने तिचे विशेष महत्त्व आहे.
महाराष्ट्रात AIBE परीक्षेसाठी मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड आणि औरंगाबाद येथे परीक्षा केंद्रे उपलब्ध होती. मात्र, अमरावती विभागात एकही केंद्र नसल्यामुळे येथील उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी दूरच्या शहरांमध्ये जावे लागत होते. अमरावती शहरात शैक्षणिक, प्रशासकीय, वाहतूक तसेच परीक्षा आयोजनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतानाही अमरावतीला AIBE परीक्षा केंद्रापासून वंचित ठेवण्यात आले होते.
दूरच्या परीक्षा केंद्रांवर जाण्याचा सर्वाधिक फटका नवोदित वकिलांना बसत होता. परीक्षा देण्यासाठी होणारा प्रवासखर्च, बाहेरगावी राहण्याचा व भोजनाचा खर्च, तसेच परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक पुस्तके व इतर साहित्याचा खर्च यामुळे उमेदवारांवर आर्थिक भार वाढत होता. याशिवाय, दूरच्या केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी करावी लागणारी धावपळ, प्रवासाचे नियोजन आणि बाहेरगावी मुक्कामाची व्यवस्था यामुळे उमेदवारांना मानसिक ताण व शारीरिक थकवाही सहन करावा लागत होता.
अमरावती येथे परीक्षा केंद्र उपलब्ध झाल्यामुळे या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. विशेषतः अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांतील उमेदवारांना नागपूरसारख्या दूरच्या शहरात जाऊन परीक्षा देण्याची आवश्यकता कमी होणार असून, त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार आहेत.
तिघांच्या प्रयत्नांना यश
अमरावती येथे AIBE परीक्षा केंद्र मिळावे यासाठी अमरावती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष मा. अॅड. बबलू उर्फ प्रशांत देशमुख यांनी अत्यंत तळमळीने आणि सातत्याने पाठपुरावा केला. नवोदित वकिलांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी हा विषय संबंधित पातळीवर सातत्याने मांडला. या पाठपुराव्यात अमरावती जिल्हा वकील संघाचे सचिव मा. अॅड . गिरीश धर्माळे, उपाध्यक्ष मा.अॅड. भोयर, मा. अॅड वरूडकर मॅडम, ग्रंथालय सचिव मा. अॅड शर्मा तसेच संपूर्ण कार्यकारिणीचे मोलाचे सहकार्य लाभले.
त्याचप्रमाणे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य मा.अॅड.आशिष देशमुख यांनीही बार कौन्सिलच्या पातळीवर या मागणीसाठी प्रभावीपणे पाठपुरावा केला. अमरावतीसह संपूर्ण विदर्भातील विधी पदवीधरांना याचा लाभ मिळावा, यासाठी त्यांनी हा प्रश्न योग्य व्यासपीठावर मांडला.
तर अॅड.वैभव अनिलराव ठाकरे यांनीही विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करत अमरावती येथे AIBE परीक्षा केंद्र सुरू करण्याची मागणी लावून धरली. अमरावती येथे केंद्राची आवश्यकता, उमेदवारांची होणारी गैरसोय आणि दूरच्या केंद्रांमुळे विद्यार्थ्यांवर पडणारा आर्थिक व मानसिक भार याबाबत त्यांनी संबंधितांचे दिल्ली पर्यत त्यांनी लक्ष वेधले.
या तिघांच्या तळमळीच्या, सातत्यपूर्ण आणि सामूहिक प्रयत्नांना अखेर यश आले असून अमरावती येथे AIBE परीक्षा केंद्र उपलब्ध झाले आहे.
अमरावती येथे AIBE परीक्षा केंद्र उपलब्ध झाल्यामुळे केवळ अमरावतीतीलच नव्हे, तर संपूर्ण अमरावती विभागातील विधी पदवीधर आणि नवोदित वकिलांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे. विदर्भातील नवोदित वकिलांसाठी ही दिलासादायक आणि अभिमानास्पद बाब मानली जात आहे.