भोकर येथे शासकीय नर्सिंग कॉलेजची मागणी;खा. अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 26/08/2026 7:08 PM

नांदेड:- माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण आणि भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भोकर येथे शासकीय परिचर्या (नर्सिंग) महाविद्यालयाला मंजुरी देण्याची मागणी केली आहे.

भोकर व लगतच्या तालुक्यांमधील मुलामुलींना आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आ. श्रीजया चव्हाण यांनी मागील वर्षभरापासून भोकर येथील उपजिल्हा रूग्णालयात नवीन शासकीय परिचर्या महाविद्यालय उभारण्याबाबत प्रयत्न सुरु केले आहेत. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या महाविद्यालयास मंजुरी देण्याबाबत आग्रही मागणी केली आहे. 

याप्रसंगी खा. अशोकराव चव्हाण यांनी नांदेड-लातूर नवीन रेल्वे मार्गाला अंतिम मंजुरी मिळण्याबाबतच्या कार्यवाहीला गती देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. या प्रकल्पासाठी आजवर दिलेल्या सहकार्याबद्दलही खा. चव्हाण यांनी त्यांचे आभार मानले. या भेटीत नांदेड येथील ५०० खाटांच्या श्रेणीवर्धीत नवीन जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीला प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेच्या मागील अधिवेशनात या इमारतीला एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन आ. श्रीजया चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरील चर्चेत दिले होते. त्याअनुषंगाने पुढील कार्यवाहीला गती देण्याची मागणी त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. 

या व्यतिरिक्त भोकर येथे पोलीस विभागाच्या प्रस्तावित कार्यालयीन व निवासी इमारतींसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा वापरण्यास मान्यता देणे, मौजे नारवट येथील वन्यप्राणी उपचार केंद्राकरिता आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, आदींसह भोकर, अर्धापूर व मुदखेड तालुक्यातील विविध विकासकामांकडे आ. श्रीजया चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले. पिंपळढव साठवण तलाव प्रकल्पासाठी नाबार्डकडून ८५.४१ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

Share

Other News

ताज्या बातम्या