जिल्हा परिषद शाळांमध्ये भौतिक सुविधांची पूर्तता करण्याचे सीईओ महेश पाटील यांचे निर्देश;जीर्ण वर्गखोल्या, स्वच्छता, शुद्ध पाणी, अग्निशामक यंत्रणा व प्रलंबित वीजबिलांवर तातडीने कार्यवाहीच्या सूचना

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 21/08/2026 8:24 PM

नांदेड : जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या भौतिक सुविधांची पूर्तता करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी शिक्षण विभागाला दिले.
     जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधांबाबत प्राप्त तक्रारी तसेच वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होत असलेल्या बातम्यांच्या अनुषंगाने आज जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष बैठक घेण्यात आली. या बैठकीत शाळांमधील जीर्ण वर्गखोल्या, दुरुस्तीची कामे आणि नवीन बांधकामे याबाबत सीईओ महेश पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
     शाळांमध्ये स्वच्छता राखणे, विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, शाळा परिसरात साचलेले पाणी व अस्वच्छता दूर करणे, तसेच विद्यार्थी व शिक्षकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्निशामक यंत्रे बसविणे अथवा नादुरुस्त यंत्रांची दुरुस्ती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. फेसाई रजिस्ट्रेशन, अंगणवाड्यासाठी अतिरिक्त वर्गखोल्या उपलब्ध करून देणे, EHRS प्रणालीमध्ये सेवा विषयक बाबी अद्ययावत करणे आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची NPS खाती १०० टक्के पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी दिले.
     शाळांच्या थकीत वीजबिलांबाबत आवश्यक कार्यवाही करणे, शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या पुस्तकांचा नियमित वापर करणे, मुलींच्या स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची पुरेशी व्यवस्था करणे आणि शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
      लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना तसेच त्यांच्या पत्रव्यवहाराची गांभीर्याने दखल घेऊन त्यावर वेळेत उपाययोजना कराव्यात, असेही महेश पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत प्रस्तावित कामे आणि त्यासाठी ठरविण्यात येणाऱ्या प्राधान्यक्रमाबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे यांनीही शिक्षण विभागास विविध महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
     बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रशांत थोरात, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, शिक्षणाधिकारी (योजना) दिलीप बनसोडे, लेखाधिकारी निळकंठ पाचंगे, समग्रचे बांधकाम कार्यकारी अभियंता उबेद खान, वरिष्ठ सहाय्यक धनंजय गुम्मलवार यांच्यासह समग्र योजनेचे कनिष्ठ अभियंता उपस्थित होते. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख सहभागी होते.

Share

Other News

ताज्या बातम्या