सांगली दि. २१,
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील वाढीव घरपट्टीच्या प्रश्नाबाबत वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज शुक्रवार दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता संपन्न झाली. या बैठकीत आतापर्यंतच्या आंदोलनाचा व पाठपुराव्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच उपस्थित नागरिकांनी केलेल्या सूचना, हरकती आणि पुढील आंदोलनाची दिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात जनजागृती मोहीम राबवून नागरिकांनी वाढीव घरपट्टी भरू नये, याबाबत जनजागृती करण्याचे निश्चित करण्यात आले.
तसेच उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री मा. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन वाढीव घरपट्टीचा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचे ठरले आहे.
वाढीव घरपट्टीविरोधात जिल्हा न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात कायदेशीर लढाईची तयारी सुरू असून, सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून लवकरच याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
कार्पेट एरिया अर्थात चटई क्षेत्राच्या आधारे घरपट्टी आकारणी करण्याबाबत मार्च २०२६ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने केलेल्या कायदेशीर तरतुदीची माहिती आज महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. याबाबत प्रशासनाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे समितीचे लक्ष आहे.
याशिवाय, पालकमंत्री महोदयांसोबत कृती समितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा व्यापक बैठक घेण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. या सर्व प्रयत्नांमधूनही वाढीव घरपट्टीच्या प्रश्नावर मार्ग निघाला नाही, तर पुढील टप्प्यात महापालिका आयुक्त, महापौर आणि विरोधी पक्षनेते यांच्या निवासस्थानासमोर रात्री १० ते १२ या वेळेत ‘झोपमोड आंदोलन’ करण्याचा इशाराही बैठकीत देण्यात आला.
गेल्या काही महिन्यांपासून समितीच्या माध्यमातून मोर्चे, निवेदने, जनआंदोलन, बंद आणि विविध प्रशासकीय पातळ्यांवर पाठपुरावा सुरू आहे. या सर्व कामकाजाचा आजच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या हक्काचा आणि आर्थिक हिताचा हा प्रश्न असून, वाढीव घरपट्टीचा अन्यायकारक बोजा नागरिकांवर लादला जाऊ नये, यासाठी कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
बैठकीस उपस्थित :
सतीश साखळकर, हणमंत पवार, एस. के. पाटील, व्ही. डी. बर्वे, आसिफ बाबा, युनूस महात, सलीम पन्हाळकर, किरण कांबळे, गजानन मिरजे, नितीन मिरजकर, रवी जय, रफिक महात, प्रा. जहांगीर तांबोळी, विलास घाडगे, ओमकार माने, शशिकांत गायकवाड, आर. आर. पाटील, सुलतान तांबोळी, अॅड. उमेश शस्त्रबुद्धे, दिलीप शिंदे, बी. एम. शिंदे, संगीता शिंदे, रेहाना शेख, रघुनाथ घाडगे आदी.
— वाढीव घरपट्टी विरोधी कृती समिती
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका