मनपाच्या 'हर घर तिरंगा' अभियाना अंतर्गत दिमाखदार तिरंगा रॅली;हजारो विद्यार्थ्यांच्या भव्य रॅलीने अवघे शहर राष्ट्रभक्तीच्या रंगात न्हाले

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 12/08/2026 8:47 PM

नांदेड : भारतीय स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासानिमित्त आणि केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने मंगळवार दि.१२.०८.२०२६ रोजी शहरात 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांची एक अभूतपूर्व आणि भव्य तिरंगा रॅली अत्यंत उत्साही व देशबक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण नांदेड शहरात निर्माण झालेला देशप्रेमाचा ज्वर आणि नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद अद्वितीय असा होता.

आज सकाळी ठीक ८.०० वाजता शहरातील तिरंगा ध्वज परिसर, शासकीय तंत्रनिकेतन चौक या ठिकाणाहून या भव्य रॅलीला *महापौर सौ.कविता संतोष मुळे* आणि *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी हिरवी झेंडी दाखवून अधिकृत सुरुवात केली. या प्रसंगी मनपा स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, शिक्षण, महिला व बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, उपसभापती निरंजना लांडगे, सभागृह नेते ॲड महेश कनकदंडे, माजी सभापती किशोर स्वामी, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, उपायुक्त गंगाधर ईरलोड, शिक्षणाधिकारी प्रविणा मांदळे, मुख्य उद्यान अधिक्षक डॉ.मिर्झा बेग, क्रिडा अधिकारी रमेश चवरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. रॅलीच्या अग्रभागी महापौर, स.पदाधिकारी, मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शिक्षणाधिकारी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक आणि एनसीसी व स्काऊट-गाईडचे पथक शिस्तबद्ध पद्धतीने चालत होते. ही रॅली शहरातील मुख्य चौक, बाजारपेठ आणि निवासी भागातून मार्गस्थ झाली. रॅलीचा संपूर्ण मार्ग तिरंगामय झाला होता.

या भव्य रॅलीमध्ये नांदेड महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील तसेच शहरातील इतर नामांकित खाजगी शाळा, महाविद्यालयांमधील हजारो विद्यार्थी व विद्यार्थिनी आपल्या गणवेशात हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाले होते. "भारत माता की जय", "वंदे मातरम" अशा गगनभेदी घोषणांनी आणि देशभक्तीपर गीतांच्या सुरांनी संपूर्ण शहराचा परिसर दुमदुमून गेला होता. रॅली ज्या ज्या मार्गावरून जात होती, त्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नांदेडच्या नागरिकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या रॅलीमुळे शहरात एक आगळेवेगळे राष्ट्रीय सणाचे वातावरण निर्माण झाले होते.

*"तिरंगा आपली राष्ट्रीय अस्मिता, प्रत्येक घरावर फडकवूया!" - महापौर*
'हर घर तिरंगा' अभियान हा आपल्या देशाप्रती आणि स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीवीरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र उत्सव आहे. नांदेडकरांचा राष्ट्रभक्तीचा इतिहास नेहमीच गौरवशाली राहिला आहे. आज शालेय विद्यार्थ्यांनी रॅलीच्या माध्यमातून जो अभूतपूर्व उत्साह दाखवला, तो कौतुकास्पद आहे. नांदेड शहरातील प्रत्येक नागरिकाने, माता-भगिनींनी आणि तरुणांनी आपल्या घरावर, व्यापारी प्रतिष्ठानांवर सन्मानाने तिरंगा फडकवून संपूर्ण नांदेड शहर राष्ट्रभक्तीच्या रंगात रंगवून टाकावे, असे विनम्र आवाहन मी महानगरपालिकेच्या वतीने करत आहे.

या भव्य रॅलीचे अत्यंत नेटके आणि शिस्तबद्ध नियोजन केल्याबद्दल मनपाच्या शिक्षण विभागाने विशेष परिश्रम घेतले. रॅलीच्या यशस्वीतेसाठी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वाहतूक पोलीस प्रशासन आणि मनपाचे स्वच्छता दूत यांनी मोलाचे सहकार्य केले. या सर्वांचे मनपा प्रशासनाच्या वतीने आभार मानण्यात आले.

Share

Other News

ताज्या बातम्या