*** सांगलीत स्मार्ट मीटरविरोधी कृती समितीची स्थापना
सांगली, दि. ११ : केंद्र सरकारच्या स्मार्ट मीटर योजनेविरोधात सांगली जिल्ह्यात व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यासाठी स्मार्ट मीटरविरोधी कृती समिती, सांगली जिल्हा स्थापन करण्यात आली असून, गुंठेवारी चळवळीचे जनक व जयहिंद सेनेचे संस्थापक अध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली.
सांगली येथील सर्किट हाऊस येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत समितीची घोषणा करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी चंदनदादा चव्हाण, उपाध्यक्षपदी समाजवादी पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर, तर सचिवपदी महेश मासाळ तर विविध संघटना व पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांना या लढ्यात " निमंत्रक " पदे देण्यात आली आहेत.
बैठकीस विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांवर होणारा आर्थिक बोजा, वीज बिलांमध्ये वाढ होत असल्याच्या तक्रारी आणि मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत नागरिकांकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
यावेळी बोलताना चंदनदादा चव्हाण यांनी सांगितले की, स्मार्ट मीटर बसविताना मेट्रोलॉजी विभागाची आवश्यक प्रमाणपत्रे, नियमानुसार चाचणी आणि निर्धारित प्रक्रिया पाळली जाणे आवश्यक आहे. मात्र, या प्रक्रियेबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलांमध्ये मोठी वाढ झाल्याच्या तक्रारींमुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. “स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जनतेची लूट होऊ देणार नाही. बेकायदा पद्धतीने स्मार्ट मीटर बसविले जात असल्यास याद राखा,” असा इशारा त्यांनी दिला.
स्मार्ट मीटरविरोधात सांगली जिल्ह्यात लवकरच मोठे जनआंदोलन उभारण्यात येणार असून, नागरिकांच्या तक्रारी संकलित करून त्यावर व्यापक जनजागृती करण्यात येईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. स्मार्ट मीटर अथवा वाढीव वीज बिलाबाबत तक्रारी असलेल्या ग्राहकांनी कृती समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर यांनी स्मार्ट मीटर योजनेची पारदर्शकता, निविदा प्रक्रिया, मीटरची अचूकता आणि ग्राहकांच्या तक्रारींचे प्रभावी निराकरण याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी केली. ग्राहकहिताचे संरक्षण करण्यासाठी कृती समितीच्या माध्यमातून संघर्ष करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्ह्यात विविध भागांत बैठका घेणे, नागरिकांच्या तक्रारी संकलित करणे, स्मार्ट मीटरबाबत जनजागृती करणे आणि आगामी आंदोलनाची व्यापक दिशा निश्चित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
बैठकीस रामदास सावंत, विजय बल्लारी, सतीश फोंडे, श्रीधर करडे, सलीम पन्हाळकर, युनूस महात, प्रणव पाटील, डॅनियल भोपळे, डॉ. मन्नान शेख, सीमा गायकवाड, सुभाष तोडकर, हुसेन शेख, दत्ता पाटील, नईम शेख, विनोद तांदळे, युवराज मोने, शिवाजी वाघमारे, प्रशांत भोरे, सरवर खान, अरुण रुपनर, गॅब्रिएल तिवडे, शहाजी भोसले, आशुतोष धोतरे, महादेव करांडे, रणजित चव्हाण, राहुल माने, ॲड. अजित सूर्यवंशी, आयुब पटेल, गोरख व्हनखंडे, जैलाब शेख, सोहेल इनामदार, नासिर शेख यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक व व्यापारी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— स्मार्ट मीटरविरोधी कृती समिती, सांगली जिल्हा