जयसिंगपूर – तमदलगे (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक श्री. रावसाहेब पुजारी यांना कृषि क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानबद्दल येथील भरत अर्बन को-आप. बॅंकेचा `श्री भरतरत्न पुरस्कार` जाहीर झाला आहे. येत्या ८ ऑगस्ट, २०२६ रोजी येथील कल्पवृक्ष गार्डन येथे बॅंकेच्या ५६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे बॅंकेचे वरिष्ठ ट्रस्टी आणि माजी चेअरमन पै. विठ्ठलराव मोरे यांनी एका पत्राद्वारे जाहीर केले आहे.
श्री. पुजारी गेली ३९ वर्षे पत्रकारितेत कार्यरत असून त्यांची ११ पुस्तके प्रकाशित आहेत. सीएसई, नवी दिल्ली या संस्थेचे ते फेलो असून १५० हून अधिक पुस्तकांचे प्रकाशक म्हणून त्यांनी काम केले आहे. शेतकरी समाजाच्या प्रबोधनासाठी अहिल्या कृषी व ग्रामीण विकास संस्था आणि ध्यास शाश्वत शेती विकास ट्रस्ट या दोन संस्थांचे ते अध्यक्ष आहेत. ते प्रयोगशील शेतकरी असून गेली २२ वर्षे `शेतीप्रगती` हे मासिक चालवितात. आजवर त्यांना राज्य शासनाच्या कृषीमित्रसह २१ हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.