गुरुंच्या सान्निध्यात संस्कारांची जोपासना; शेटे महाविद्यालयात गुरुपूजन व वृक्षारोपण उत्साहात
शिक्षण मंडळ भगूर संचलित श्री एकनाथराव सहादू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त गुरुपूजन व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचा गौरव आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक तसेच स्वामी विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळ भगूरचे कार्याध्यक्ष मा. श्री. एकनाथराव सहादू शेटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद केंद्राच्या श्रीमती नयनाताई देशमुख तसेच आदरणीय नयनदादा पवार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
प्राचार्य डॉ. मृत्युंजय कापसे यांनी प्रास्ताविकातून गुरुपौर्णिमेचे महत्त्व, भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे स्थान आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात गुरुंची भूमिका यावर प्रकाश टाकला. त्यानंतर श्रीमती नयनाताई देशमुख यांनी स्वामी विवेकानंद केंद्राचा परिचय करून देत राष्ट्रनिर्माण, व्यक्तिमत्त्व विकास आणि समाजसेवेसाठी केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व गुरुजनांना पुष्प अर्पण करून गुरुपूजन केले. प्रमुख मार्गदर्शक आदरणीय नयनदादा पवार यांनी "विवेकानंद केंद्राचे कार्य आणि गुरुपौर्णिमा – युवा म्हणून आपली भूमिका" या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. युवकांनी राष्ट्रप्रेम, सेवाभाव, चारित्र्यनिर्मिती आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जोपासून समाजकार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. अध्यक्षीय मनोगतात मा. श्री. एकनाथराव सहादू शेटे यांनी गुरुंच्या मार्गदर्शनातूनच सुसंस्कारित पिढी घडते, असे प्रतिपादन करत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गायत्री हरळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. तुषार तेलोरे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच स्वामी विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते उपस्थित होते.