अंतिम मुदतीची वाट न पाहता पीक विमा योजनेत सहभागी व्हा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 30/07/2026 6:52 AM

नांदेड :- प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 अंतर्गत जिल्ह्यात पीक विमा नोंदणी सुरू असून, योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2026 ही अंतिम मुदत आहे. अंतिम मुदतीस आता केवळ दोन दिवस शिल्लक असून, शेतकरी बांधवांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता तातडीने पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

जिल्ह्यात आजअखेर 4 लाख 42 हजार 406 शेतकऱ्यांनी एकूण 7 लाख 77 हजार 442 पीक विमा अर्ज दाखल केले असून, 5 लाख 5 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे.

शेतकरी बांधवांनी आपल्या जवळील ग्राहक सेवा केंद्र, बँक अथवा पीक विमा पोर्टलवरील शेतकरी लॉगिनद्वारे स्वतःही पीक विमा नोंदणी करावी. ग्राहक सेवा केंद्रामध्ये पीक विमा नोंदणी विनाशुल्क केली जाते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी विमा हप्त्याव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क ग्राहक सेवा केंद्र चालकास देऊ नये. तसेच, सीएससी लॉगिनमधून नोंदणी करताना अडचण येत असल्यास शेतकऱ्यांनी पीक विमा पोर्टलवरील शेतकरी लॉगिनचा वापर करून नोंदणी करावी.

पीक विमा नोंदणीसाठी ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य असून, आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज सादर करावेत. तसेच विमा कंपनीचा सुधारित टोल फ्री क्रमांक 14447 असून, सर्व विमाधारक शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी.

यंदा जिल्ह्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला असून, अनेक भागांत अद्यापही समाधानकारक पावसाची आवश्यकता आहे. हवामान विभागाने पुढील कालावधीतही कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळसदृश परिस्थिती, रोग व किडीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळण्यासाठी पीक विमा अत्यंत महत्त्वाचा आहे.

31 जुलै 2026 नंतर पीक विमा नोंदणीस कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नसल्याने पात्र शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता तात्काळ पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या