-जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा घेतला आढावा
सांगली, दि. २८,
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, अशा पद्धतीने पोलीस प्रशासनाने अधिक सतर्कतेने व प्रभावीपणे काम करावे, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे आदि उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक सतर्क राहून संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवावी, सीसीटीव्ही यंत्रणांचे जाळे मजबूत करून त्याचा प्रभावी वापर करावा आणि नागरिकांशी समन्वय वाढवून गुन्हे रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सूचित केले.
गुंडाविरोधी पथक स्थापन केल्याबाबत समाधान व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पोलीस दलाने विविध अद्ययावत यंत्रणा व उपकरणांची मदत घ्यावी. नियमित शस्त्र तपासणी करावी. गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना तातडीने अटक करून दोषारोपपत्र वेळेत दाखल करावे, गंभीर गुन्ह्यांतील अटक करण्यात आलेल्या आरोपींचे दोषारोपपत्र प्रक्रिया गतीने करावी. तसेच सराईत गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. शस्त्र परवान्यांचा आढावा घेऊन आवश्यकता असेल तरच शस्त्र परवाने द्यावेत, याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. तसेच, आगामी काळात व्यापक स्तरावर अमली पदार्थ विरोधी पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीत जिल्ह्यातील गुन्हेगारीची सद्यस्थिती, गंभीर गुन्ह्यांचा तपास, गुन्हेगारांवरील प्रतिबंधात्मक कारवाई, अमली पदार्थ विरोधी मोहीम, संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण, महिलांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणारे उपाय, रात्रीची गस्त, संवेदनशील भागांतील पोलीस बंदोबस्त तसेच सोशल मीडियावरील अफवांवर नियंत्रण याचा सविस्तर आढावा घेऊन त्यावर उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.