सांगली, दि. १२ जून २०२६ : समस्त सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व घरपट्टी धारकांना वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की, महानगरपालिकेकडून प्राप्त झालेल्या घरपट्टी निर्धारणाच्या नोटिसांची काळजीपूर्वक तपासणी करावी. सदर नोटिसांमधील मालमत्तेचे क्षेत्रफळ, वापराचा प्रकार, बांधकामाचे स्वरूप, भोगवटादाराचे नाव, कर आकारणीची रक्कम तसेच इतर तपशीलांमध्ये काही त्रुटी अथवा विसंगती आढळल्यास त्याबाबत तात्काळ हरकती दाखल कराव्यात.
संबंधित हरकती ऑनलाईन पद्धतीने अथवा महानगरपालिकेच्या संबंधित कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन निर्धारित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. हरकती दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर नोटिशीमध्ये नमूद केलेली माहिती व कराची रक्कम संबंधित मालमत्ता धारकांनी मान्य केली आहे, असे गृहीत धरले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन नोटिशीतील त्रुटी शोधून तात्काळ हरकती दाखल कराव्यात.
तसेच, वाढीव घरपट्टीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडत असल्याने महानगरपालिका प्रशासन, महापौर तसेच सर्व पदाधिकाऱ्यांना कृती समितीच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात वितरित करण्यात आलेल्या घरपट्टी नोटिसांबाबत तात्काळ दिलासा देणारा निर्णय जाहीर करावा आणि अन्यायकारक कर वाढ मागे घेण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी.
सर्व घरपट्टी धारकांनी आपल्या हक्कांसाठी जागरूक राहून कायदेशीर प्रक्रियेद्वारे हरकती नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
– वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीसांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका
प्रमुख सदस्य :सतीश साखळकर, हणमंत पवार, वि. द. बर्वे,रवींद्र वळवडे,शंभूराज काटकर,आनंद देसाई.