नांदेड :- महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात १०० वृक्षरोपांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि उच्च शिक्षण विभाग, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला हा हरित उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या विशेष उपक्रमांतर्गत विद्यापीठ परिसरात विविध प्रकारच्या फळझाडांसह पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षलागवडीच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि हरित परिसर निर्मितीचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, "वृक्षलागवड ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून पर्यावरण रक्षणाची दीर्घकालीन जबाबदारी आहे. विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी वृक्षारोपणासोबतच त्यांचे संगोपन करण्यालाही प्राधान्य द्यावे. वाढदिवस आणि इतर महत्त्वाचे समारंभ पर्यावरणपूरक उपक्रमांनी साजरे करण्याची संस्कृती समाजात रुजविणे ही काळाची गरज आहे."
विद्यापीठात सामाजिक बांधिलकी जपत विविध पर्यावरणपूरक आणि जनहिताचे उपक्रम सातत्याने राबविले जात असून, अशा उपक्रमांमधून समाजासमोर आदर्श निर्माण करण्याची परंपरा जोपासली जात असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
या वृक्षारोपण कार्यक्रमास कुलगुरु डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, उच्च शिक्षण विभाग नांदेडचे सह-संचालक डॉ. बाबासाहेब भोसले, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजाराम माने, वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजेश शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. एम. जी. गायकवाड, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, उद्यान विभागाचे सहाय्यक कुलसचिव रामदास पेद्देवाड यांच्यासह उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृक्षलागवडीच्या या उपक्रमामुळे विद्यापीठ परिसर अधिक हिरवागार होण्यास हातभार लागणार असून, पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा महत्त्वपूर्ण संदेशही समाजापर्यंत पोहोचला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आणि यशस्वीरीत्या पार पडला.