नांदेड : नांदेड तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांची खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक आज जिल्हा असोसिएशन हॉल, नवीन मोढा, नांदेड येथे संपन्न झाली. कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम २०२६ संदर्भात मार्गदर्शन व आवश्यक सूचना देण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून कृषी निविष्ठा विक्रेत्यांना मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल यांनी सोयाबीन बियाण्यांच्या उगवण तक्रारी टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी जागतिक आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरिया व डीएपी खतांचा संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन आवश्यक नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच ‘अल-निनो’च्या पार्श्वभूमीवर उद्भवू शकणाऱ्या कृषी आपत्कालीन परिस्थितीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीस कृषी विकास अधिकारी निलकुमार ऐतवडे, जिल्हा परिषद मोहीम अधिकारी सचिन कपाळे, जिगुनिनी अमोल पेकम, कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) सौ. पूनम चातमल, कृषी अधिकारी (पंचायत समिती, नांदेड) सौ. छाया देशमुख, माफदाचे महासचिव विपीन कासलीवाल तसेच माजी जिल्हाध्यक्ष ओंकार रहाटे उपस्थित होते.
कृषी निविष्ठा संघटनेच्या वतीने विक्रेत्यांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल यांनी केली. बैठकीस कृषी निविष्ठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सदाशिव पुंड, नांदेड तालुका अध्यक्ष श्रीधरराव नागापूरकर, सचिव श्रीकांत वैद्य यांची विशेष उपस्थिती होती.
या बैठकीस नांदेड तालुक्यातील कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी, कृषी निविष्ठा विक्रेते तसेच अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.