एस. आय. आर. प्रक्रिया वेळेत, पारदर्शक व अचूकतेने पूर्ण करावी : मुख्य निवडणुक अधिकारी एस. चोकलिंगम्

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/05/2026 8:30 PM

- सांगली जिल्ह्यातील मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचा घेतला आढावा

 सांगली, दि.२७,
 विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) प्रक्रिया जून ते ऑक्टोबर या दरम्यान राबवली जाणार आहे. यामध्ये घराघरात जावून मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. या प्रक्रियेंतर्गत कोणत्याही पात्र मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत आणि एकही अपात्र व्यक्ती यादीत राहणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने ठेवावी. एस.आय.आर. प्रक्रिया वेळेत, पारदर्शकपणे व अचूकतेने पूर्ण करावी. यामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही, यासाठी सतर्कतेने कार्यवाही करावी, अशा सूचना अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम् यांनी आज येथे दिले. 

 भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) कार्यक्रमाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम् म्हणाले, विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण अंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बीएलओ घरोघरी प्रत्यक्ष जाऊन मतदारांना गणना प्रपत्राचे वाटप व भरलेले अर्ज परत घेतील. मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करून दोषविरहित आणि अद्ययावत नवीन मतदार यादी अस्तित्वात येणार आहे. तयार होणारी मतदार यादी ही केवळ दुरुस्त किंवा सुधारित नसून संपूर्ण नव्या स्वरूपातील असेल. ही प्रक्रिया राबवताना बूथ लेव्हल अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तंतोतंत कार्यवाही करावी. आवश्यकतेनुसार यासाठी शिबिर आयोजित करावे, असे ते म्हणाले.

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम् म्हणाले, ही प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यासाठी प्रत्येक बीएलओ आणि बीएलए यांना योग्य प्रशिक्षण द्यावे. त्यांच्या शंकांचे निरसन करावे. प्रत्यक्ष प्रक्रियेदरम्यान  झोपडपट्ट्या, दुर्गम भाग तसेच तृतीयपंथीयांसह सर्व घटकांतील नागरिकांचा मतदार यादीत समावेश सुनिश्चित करावा. तसेच, प्रत्येक घर, झोपडी किंवा निवासस्थानाला स्वतंत्र ओळख क्रमांक देणे, कुटुंबाचा संपर्क क्रमांक आणि संपूर्ण पत्ता नोंदविणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रांची तपासणी अचूक पद्धतीने करावी. मात्र, नागरिकांना याचा त्रास होणार नाही तसेच गणना अर्जांची छपाई विहित वेळेत पूर्ण होईल, यासाठी दक्ष राहावे, असे ते म्हणाले.

यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम् यांनी मतदार नोंदणी अधिकारी संवाद साधून प्रत्यक्ष कार्यवाही, संभाव्य शंका याबाबत सविस्तर माहिती दिली.

 बैठकीच्या प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती दिली. राज्यात आजमितीस 72.04 टक्के मॅपिंग पूर्ण झाले असून, सांगली जिल्ह्यात 85.35 टक्के मॅपिंग पूर्ण झाले असून, सांगली जिल्हा राज्यात बाराव्या स्थानी आहे. जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यासाठी 2 हजार 482 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) प्रत्यक्ष घरभेटीद्वारे पडताळणी करणार आहेत. तसेच विविध राजकीय पक्षांकडून 4 हजार 439 मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) नियुक्त करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.  

एस.आय.आर. वेळापत्रक
  २० ते २९ जून २०२६ - गणना अर्जांची छपाई आणि बीएलओ यांचे प्रशिक्षण
  ३० जून ते २९ जुलै २०२६ - बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांना गणना प्रपत्राचे वाटप व भरलेले अर्ज परत घेतील.
  ५ ऑगस्ट २०२६ - प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.
  ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ - या प्रारुप यादीवर दावे व हरकती नोंदवता येतील,
  ३ ऑक्टोबर २०२६ - पर्यंत दावे व हरकती निकालात काढल्या जातील
  ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी केली जाईल.

दरम्यान बैठकीनंतर मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम् यांनी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच पुनरिक्षण कार्यक्रमाच्या प्रशासकीय नियोजनाचा आढावा घेतला.

Share

Other News

ताज्या बातम्या