नांदेड :- नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने विविध विभागातील पुढील सहा महिन्यांत सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय सेवानिवृत्तीपूर्व प्रशिक्षण शिबिराचा आज उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित या अभिनव उपक्रमाला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य अधिक सक्षम, सुरक्षित आणि आनंदी व्हावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण शिबिरात आर्थिक नियोजन, आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, सायबर साक्षरता, जीवनशैली व्यवस्थापन तसेच सामाजिक सहभाग अशा विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड, लेखाधिकारी निळकंठ पांचगे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहा्य्यक शुभम तेलेवाड आदी उपस्थित होते.
समारोप प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्ती ही केवळ सेवेतून मुक्तता नसून आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात असल्याचे सांगितले. सेवाकाळातील अनुभव, समाजासाठी दिलेले योगदान आणि पुढील आयुष्यातील सकारात्मक दृष्टीकोन यांचा समतोल साधणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी आर्थिक फसवणूक कशी टाळावी याविषयी एसबीआयचे हरिश यादव, आरोग्य विम्याविषयी गौरव जोशी, पेन्शन लोनविषयी कपील ढवळे, प्रवास करताना घ्यावयाची काळजी याविषयी कुलदीप जोशी, तर सेवानिवृत्तीनंतर इन्शुरन्स व इतर क्षेत्रांमध्ये उपलब्ध संधी याविषयी एलआयसीचे विकास अधिकारी ज्ञानेश्वर थोटे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मिलिंद व्यवहारे यांनी केले.
जिल्हा परिषदेने प्रथमच राबविलेल्या या उपक्रमामुळे सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनाकडे नव्या आत्मविश्वासाने पाहण्याची दिशा मिळाल्याची भावना सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. अशा प्रशिक्षणामुळे मानसिक, सामाजिक आणि आर्थिक तयारीस मोठी मदत होत असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले.
यावेळी सहभागी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव, आठवणी आणि सेवानिवृत्तीनंतरच्या नियोजनाविषयी मनोगते व्यक्त केली. सभागृहात भावनिक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.
चौकट
ज्येष्ठ नागरिकांनी भावनेपेक्षा भविष्यातील सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे- भार्गवी मुंडे
वृद्धापकाळात आर्थिक स्थैर्य, सन्मान आणि कौटुंबिक शांतता टिकवून ठेवण्यासाठी वसीयत आणि वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षितता या विषयावर सीएम फेलो भार्गवी मुंडे यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या मालमत्तेचे नियोजन कायदेशीर पद्धतीने करावे, वसीयत तयार करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा तसेच स्वतःच्या आरोग्य, निवास व दैनंदिन खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद ठेवावी. भावनेपेक्षा भविष्यातील सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
चौकट नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले सेवानिवृत्तीपूर्व प्रशिक्षण शिबिर हे केवळ औपचारिक मार्गदर्शन न ठरता, सेवेनंतरच्या आयुष्याची सकारात्मक तयारी करून देणारे व्यासपीठ ठरले. शासकीय सेवेत अनेक वर्षे योगदान दिल्यानंतर अचानक बदलणाऱ्या जीवनशैलीशी जुळवून घेताना येणाऱ्या आर्थिक, मानसिक आणि सामाजिक आव्हानांचा विचार करून या शिबिराची संकल्पना राबविण्यात आली.