लोक अदालतीमध्ये महापालिकेने केला १ कोटी ४६ लक्ष मालमत्ता कर वसुल

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 10/05/2026 12:09 PM

नांदेड : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०९.०५.२०२६ रोजी पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोक अदालतीच्या अनुषंगाने मालमत्ता धारकांना आपल्या मालमत्ता करा विषयी असलेल्या तक्रारीच्या निवारणासाठी सहकार्य करून मालमत्ता कराचा भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

या राष्ट्रीय लोक अदालतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या थकबाकीदार मालमत्ता धारकांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने दिनांक ०९.०५.२०२६ रोजी सकाळी १०.३० वाजल्या पासुन लोक अदालतीस सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय लोक अदालतीसाठी आलेल्या मालमत्ता धारकांना *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे व न्यायाधीश डी. एस. निंबाळकर (पॅनल प्रमुख), अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार* यांनी कायदेविषयक बाबी समजावून सांगितल्या व मालमत्ताधारकांच्या तक्रारीचे निरसन केले. आज झालेल्या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये *एकूण ७५३ मालमत्ताधारकांनी* थकबाकीवरील शास्तीत ८०% सुट योजनेचा लाभ घेवुन एकुण तब्बल १ कोटी ४६ लक्ष एवढ्या रकमेचा मालमत्ता कर भरणा केला.

या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये *प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन. के. ब्रम्हो, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे,* सचिव विधी सेवा प्राधीकरण एस.जी. देशपांडे, न्यायाधिश डी. एस. निंबाळकर, सह दिवाणी न्यायाधिशस्तर, नांदेड (पॅनल प्रमुख), एडवोकेट समीउल्ला खान, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, सहाय्यक आयुक्त मनिषा नरसाळे, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, मनपाच्या सहा क्षेत्रिय कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी मिर्झा फरहतुल्लाह बेग, रमेश चवरे, रावण सोनसळे, गौतम कवडे, निलावती डावरे, राजेश जाधव, न्यायालयीन कर्मचारी एम.बी. भोसीकर, एम. पी. सावरकर, बी. एन. मनसकरगेकर सर्व क्षेत्रिय कार्यालयाचे वसुली पर्यवेक्षक, वसुली लिपीक व त्यांचे सहाय्यक उपस्थित होते.

पालिका हद्दीतील ज्या मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्ता कराचा अद्याप भरणा केला नाही त्यांनी तात्काळ कर भरणा करावा व भविष्यात मनपाकडून होणाऱ्या जप्ती, नळबंद करणे, ड्रेनेज बंद करणे, लिलाव करणे या सारख्या अप्रिय कार्यवाह्या टाळाव्यात असे आवाहन *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी मालमत्ताधारकांना केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या