अहिल्यानगर| प्रतिनिधी
वाहतूक नियमांचे पालन हे केवळ सर्वसामान्य नागरिकांसाठीच नव्हे, तर पोलीस दलासाठीही तितकेच बंधनकारक असल्याचा ठाम संदेश देत जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट वापर सक्तीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दुचाकीवर प्रवास करताना हेल्मेट न घालणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले असून, या निर्णयाची अंमलबजावणीही तत्काळ सुरू करण्यात आली आहे.
शुक्रवारी (ता. ८) सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात या मोहिमेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली. शहर वाहतूक शाखेच्या दोन अंमलदारांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उभे राहून दुचाकीवर येणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी केली. यावेळी विना हेल्मेट आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर ई-चलन मशीनच्या सहाय्याने दंड आकारण्यात आला. विशेष म्हणजे, या कारवाईत कोणतीही सवलत न देता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट दंडात्मक प्रक्रिया करण्यात आली.
गेल्या काही दिवसांत शहरासह जिल्ह्यात वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत विविध जनजागृती मोहिमा राबविल्या जात आहेत. नागरिकांना हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले जात असताना पोलिसांनी स्वतः नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी व्यक्त केले. “वाहतूक नियम सर्वांसाठी समान आहेत. कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी पोलिसांवर अधिक आहे. नागरिकांनी नियम पाळावेत, असे सांगताना पोलिसांनी स्वतः आदर्श घालून दिला पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे पोलीस दलात शिस्त वाढण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे. तसेच नागरिकांमध्येही वाहतूक नियमांविषयी अधिक जागरूकता निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अनेक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत “नियम सर्वांसाठी समान” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे कौतुक केले आहे.
वाहतूक अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण मोठे असून, हेल्मेटचा वापर केल्यास गंभीर दुखापती टाळता येतात. त्यामुळे हेल्मेट वापराबाबत केवळ नागरिकांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी स्वतःपासून सुरुवात केल्याने या मोहिमेला अधिक विश्वासार्हता मिळाल्याची चर्चा शहरात सुरू आहे.