संगीत शंकर दरबार व कुसुम महोत्सवची तयारी अंतिम टप्प्यात;२५ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान नांदेडला रंगणार संगीत, खाद्यपदार्थ व खरेदीचा सोहळा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 23/02/2026 6:04 PM

नांदेड : माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण आणि कै. कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘संगीत शंकर दरबार’ आणि ‘कुसुम महोत्सव’ या भव्य सांस्कृतिक सोहळ्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा माजी पालकमंत्री डी.पी. सावंत आणि आ. श्रीजया चव्हाण यांनी सोमवारी दुपारी यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावरील कार्यक्रम स्थळाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. 

दरवर्षीच नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणाऱ्या या दोन्ही कार्यक्रमांच्या निमित्ताने नांदेड शहरात संगीत, संस्कृती, खाद्यपदार्थ आणि खरेदीचा सोहळा रंगणार आहे. ‘संगीत शंकर दरबार’ या कार्यक्रमांतर्गत बुधवारी २५ फेब्रुवारी रोजी सायं. ५.३० वाजता अनुपम जोशी यांचे सरोदवादन व रूचिरा केदार आणि पं. रघुनंदन पणशीकर यांचे शास्त्रीय गायन होईल. संगीत क्षेत्रातील भरीव योगदानासाठी बनारस घराण्याचे प्रसिद्ध तबला वादक सम्राट पंडित शारदा सहाय यांचे पट्टशिष्य डॉ. राम बोरगावकर (लातूर) यांना याच दिवशी ‘संगीत शंकर दरबार जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. 

गुरुवारी २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता आदित्य मोडक व अनुराधा कुबेर यांचे शास्त्रीय गायन तसेच डॉ. मैसूर मंजुनाथ व मैसूर नागराज यांच्या व्हायोलिन जुगलबंदीचा कार्यक्रम रसिकांना अनुभवता येईल. शुक्रवारी २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सकाळी ६.०० वाजता मंगेश बोरगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या 'माय मराठी, सूर मराठी' या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'मराठी पहाट'चा हा कार्यक्रम कुसुम सभागृहात होईल. 

‘कुसुम महोत्सव’अंतर्गत शुक्रवारी २७ फेब्रुवारी रोजी सायं. ६.०० वाजता मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून ‘द फोक मराठी’ या तब्बल १०० कलावंतांच्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन घडणार आहे. शनिवारी २८ फेब्रुवारी रोजी हिंदी चित्रपट क्षेत्रातील नायिकांवर आधारित ‘कलर्स ऑफ बॉलीवूड’ हा फॅशन शो होणार असून, परीक्षणासाठी ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या लोकप्रिय मालिकेतील ज्ञानदा रामतीर्थकर आणि विजय आंदळकर ही जोडी उपस्थित राहिल. याच दिवशी कविता राम, मदन शुक्ला, दत्तात्रय मेस्त्री आणि रेशमा चतुरे आदी प्रतिभाशाली गायकांच्या म्युझिकल नाईटने कार्यक्रमाची रंगत अधिक वाढणार आहे. रविवारी १ मार्च रोजी पद्मश्री पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचा ‘कैलासा लाईव्ह’ या कॉन्सर्टने कुसुम महोत्सवाची सांगता होईल. 

२७ फेब्रुवारी ते १ मार्च हे तीनही दिवस सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत यशवंत महाविद्यालयाच्या मैदानात शॉपिंग व फूड फेस्टिव्हल सुरू राहणार असून, यंदा १५० हून अधिक शॉपिंग स्टॉल्स आणि ५० हून अधिक फूड स्टॉल्स या उपक्रमात सहभागी होणार आहेत. हे दोन्ही महोत्सव संगीत, संस्कृती, खाद्यसंस्कृती आणि खरेदीकरिता नांदेडकरांसाठी पर्वणी ठरणार आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या