नांदेड - येथील महात्मा फुले हायस्कूलच्या तीन विद्यार्थ्यांनी कराटे व क्रिकेट या क्रीडा प्रकारात राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा व जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
१४ वर्षांखालील शालेय राज्यस्तरीय कराटे स्पर्धात रुद्रराज नितीन पारदे याने राज्यातून प्रथम क्रमांक पटकावत भव्य यश मिळविले. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर इंदोर मध्यप्रदेश येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
तसेच १४ वर्षांखालील शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेतील निवड चाचणीत अफान शेखानी याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. नाशिक येथे झालेल्या निवड प्रक्रियेनंतर राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड निश्चित झाली आहे. दरम्यान, युवराज दत्ता रामरूपे याची गतवर्षी केंडन्स या नामांकित क्रिकेट अकॅडमीत निवड झाली होती. सातत्यपूर्ण सराव व उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याची निवड महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या महाराष्ट्र क्रिकेट संघात झाली. गुजरात येथे झालेल्या पाच राज्यांच्या स्पर्धेत त्याने दोन सामन्यात मॅन ऑफ द मॅच किताब पटकावत निवड समितीचे लक्ष वेधले. त्यानंतर मुंबई, गुजरात, बडोदा, सौराष्ट्र व महाराष्ट्र संघांसोबत विकेटकीपर व फलंदाज म्हणून वेस्ट झोन इंडिया संघाच्या कॅम्पसाठी त्याची निवड झाली आहे.
महात्मा फुले हायस्कूलच्या या तिन्ही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे शाळेच्या क्रीडा परंपरेत मानाचा तुरा रोवला गेला असून नांदेड जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.