अनुसूचित जातीतील युवक-युवतींसाठी बार्टीचा २८ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे भव्य करिअर अँड एम्प्लॉयमेंट फेअर

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 21/02/2026 7:26 PM

नांदेड :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने अनुसूचित जातीतील युवक-युवतींसाठी विदेशातील नोकरी व करिअर संधी उपलब्ध करून देण्यासाठी बार्टी करिअर अँड एम्प्लॉयमेंट फेअरचे आयोजन करण्यात आले आहे.
     हा फेअर दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत नांदेड येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर फेअर महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील १८ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींसाठी असून, प्रवेश व मार्गदर्शन पूर्णपणे विनामूल्य आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते होणार आहे.
       या कार्यक्रमात अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कतार, बहरीन, कुवेत व ओमान या देशांमधील रोजगार संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दुबई येथील काही प्रतिष्ठित मान्यवर व अधिकारी तसेच बार्टीचे महासंचालक सुनील वारे, निबंधक विशाल लोंढे व इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
       या कार्यशाळेमध्ये ग्लोबल जॉब मार्केटमधील संधी, योग्य देशाची निवड, आवश्यक पात्रता व कौशल्ये, भाषा प्रशिक्षण, अर्ज प्रक्रिया, प्रभावी रेज्युमे तयार करणे, मुलाखत तयारी, व्हिसा प्रक्रिया, प्लेसमेंट एजन्सी, कायदेशीर बाबी, पगार संरचना, खर्च व आर्थिक नियोजन तसेच दीर्घकालीन करिअर नियोजन याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे मार्गदर्शन बार्टीच्या पॅनलवरील एजन्सी प्रेरणा कन्सल्टन्सी, मुंबई यांच्या माध्यमातून केले जाणार आहे.
       उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्रे व गुणपत्रिकांच्या झेरॉक्स प्रती, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड तसेच दोन पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. परदेशात नोकरी व करिअर घडविण्याची संधी शोधणाऱ्या पात्र युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टीच्या ओव्हरसीज प्रोग्रामचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड, प्रज्ञा मोहिते व महेश गवई यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या