नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात व्हावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आवश्यक दक्षता घ्यावी, आचारसंहिता भंगाची तक्रार तात्काळ निकाली काढावी. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची नियोजित कालमर्यादेत नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पथके कार्यरत ठेवावीत, एक खिडकी कक्षातुन रॅली, सभा, वाहने इत्यादींची परवानगी देतांना कोणत्याही राजकीय पक्षांना झुकते माप न देता तटस्थ राहुन कार्य पार पाडावे, असे विविध निर्देश *निवडणूक निरीक्षक नतिशा माथुर* यांनी दिले आहेत. दरम्यान, आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस, उत्पादन शुल्क व इतर विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.
राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक मतदान केंद्र निश्चितीबाबत निकष ठरवून दिले आहेत. त्यानुसार, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात एकुण ६०० मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रावर वीज पुरवठा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे, रॅम्प आदींची सुविधा करावी. मागील पालिका निवडणूकीपेक्षा या निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर द्यावा, जनजागृतीचे कार्यक्रम राबवावेत. नांदेड वाघाळा शहर महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने *मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.महेशकुमार डोईफोडे*, सर्व निवडणूककामी नियुक्त अधिकारी, पालिकेच्या विविध खात्याचे विभाग प्रमुख यांची संयुक्त बैठक बुधवार दि.३१.१२.२०२५ रोजी महानगरपालिका मुख्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
बैठकीच्या प्रारंभी *मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी निवडणूकीचे टप्पे अर्थात प्रभाग रचना, आरक्षण निश्चीती, मतदार यादी, मतदार केंद्र निश्चिती, निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्ती व निवडणूक कार्यक्रम यासंदर्भात माहिती विशद केली. तदनंतर निवडणूक निरीक्षकांनी निवडणूक कामी नियुक्ती सर्व अधिकाऱ्यांची ओळख करुन घेऊन त्यांच्याकडील कामाचा आढावा घेतला.
*चौकट*
*निवडणूक निरीक्षकांनी 7 R.O. ऑफिस व स्टॉग रुमची केली पाहणी :-*
मुख्य कार्यालयातील बैठक पार पाडल्यानंतर *मुख्य निवडणूक निरीक्षक नतिशा माथुर* यांनी पालिका हद्दीतील सर्व ७ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील कामाकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी छाननी प्रक्रिया व आचारसंहिता आढावा घेत कामाकाजाबाबत समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे शासकीय तंत्रनिकेतन येथील स्ट्रॉग रुम व मतमोजणी केंद्राची पाहणी करतांना इव्हीएम सिलिंग बाबत आढाव घेत संबंधीत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. यावेळी त्यांच्या समवेत मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, सहाय्यक निवडणूक निरीक्षक महेंद्र कुमार कांबळे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, सहाय्यक आयुक्त मो. गुलाम सादेक, जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसाडे आदी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेसंबंधी सर्व पूर्वतयारी काटेकोरपणे सुरु असुन नियोजनबध्द आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याठी पालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे *पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी सांगितले.