नांदेड : सहकार क्षेत्रात अत्यंत सन्मानाने काम करणाऱ्या आणि ग्राहकांच्या पहिल्या पसंतीला उतरलेल्या दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या 23 व्या व्याख्यानमालेला शनिवार दिनांक 20 डिसेंबर पासून सुरुवात होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष आहे, ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन बँकेने देखील पंच परिवर्तनातील या विषयासंदर्भात जनजागृती करण्याचा विचार केलेला आहे. या व्याख्यानमालेत यावर्षी ऑर्गनायझरचे संपादक मा.प्रफुल्ल केतकर आणि राजस्थान येथील क्षत्रिय संयोजन पर्यावरण संरक्षण गतिविधिचे मा.विनोद मेलाना हे विचार पुष्प गुंफणार आहेत.
नांदेड शहरातील कुसुमसभागृहात दिनांक 20 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता भाग्यलक्ष्मी बँकेच्या 23 व्या व्याख्यानमालीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. व्याख्यानमालेतील पहिले पुष्प " जागतिक राजकारण आणि भारतासमोरील आव्हाने " या विषयावर ऑर्गनायझरचे संपादक मा.प्रफुल्ल केतकर हे गुंफणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे उपस्थित राहणार आहेत . रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता दुसरे पुष्प राजस्थान येथील क्षत्रीय संयोजन पर्यावरण संरक्षण गतीविधीचे मा. विनोद मेलाना हे " पर्यावरण " या विषयावर गुंफणार आहेत. दुसऱ्या विचारपुष्पाचे प्रमुख अतिथी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालया नांदेड ,अधिष्ठाता डॉ. यशवंत राजपाल पाटील हे असणार आहेत.
आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय व्याख्यानमालेला नागरिकांनी उपस्थित राहावे , असे आवाहन दि भाग्यलक्ष्मी बँकेच्या अध्यक्षा सीमा किशोर आतनुरकर , उपाध्यक्ष रेखा साहेबराव मोरे , मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा प्रभाकर पराडकर आणि दि भाग्यलक्ष्मी बँकेच्या सर्व संचालक मंडळ आणि व्यवस्थापन मंडळाने केले आहे. व्याख्यानमाला वेळेवर सुरू होणार असून नागरिकांनी नियोजित वेळेचे दहा मिनिट आधी उपस्थित राहावे असे आवाहनही संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.