नांदेड :- दिनांक १८ डिसेंबर हा दिवस ‘अल्पसंख्याक हक्क दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. अल्पसंख्याक विकास विभागाचे परिपत्रक १० डिसेंबर २०२५ अन्वये जिल्हा प्रशासनाच्यावतीने अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले होते.
संयुक्त राष्ट्र संघटनेने १८ डिसेंबर १९९२ रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचा जाहीरनामा स्वीकारला. या जाहीरनाम्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म व परंपरा जतन व संवर्धन करण्याचा अधिकार असून, या हक्कांची प्रभावी अभिव्यक्ती व्हावी, या उद्देशाने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सूचनेनुसार दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येतो.
या कार्यक्रमासाठी व्याख्याते म्हणून नमस्ते नांदेडचे पत्रकार रोहन ऋषिकेश कोंडेकर मोहम्मद जिशान बेग (जनकल्याण सेवाभावी संस्था, मुखेड) तसेच रेह. मोझेस पॉल (अध्यक्ष, शालोम मिनिस्ट्री, नांदेड) यांना निमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी रोहन ऋषिकेश कोंडेकर यांनी भारतीय संविधानातील अनुच्छेद १४ व १५ तसेच कलम ३०(१) यांचा उल्लेख करत अल्पसंख्याकांना समानता, भेदभावाविरुद्ध संरक्षण आणि शैक्षणिक संस्था स्थापन व व्यवस्थापनाचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही जाती-धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समाजमाध्यमांचा वापर करताना सामाजिक सौहार्द बिघडणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
दुसरे व्याख्याते मोहम्मद जिशान बेग यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे भारतातील लोकशाही मजबूत असून अल्पसंख्याक समुदायाला संरक्षण मिळाल्याचे सांगितले. जाती व धर्माधारित भेदभाव कमी होत असून, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक व स्पर्धा परीक्षेतील सहभाग वाढविण्यासाठी जिल्हास्तरावर प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.
यावेळी रेह. मोझेस पॉल यांनी ‘अल्पसंख्याक म्हणजे कोण?’ याबाबत सविस्तर माहिती देत शिक्षणाचा अधिकार, सामाजिक समानता, धार्मिक स्वातंत्र्य व सांस्कृतिक जतन या विषयांवर भाष्य केले. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा अल्पसंख्याक समुदायाला लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील सर्व धर्मीय नागरिक भारतीयत्वाच्या भावनेने एकत्र राहत असल्याचे सांगत, प्रसिद्ध शायर इकबाल यांच्या ओळींनी त्यांनी आपल्या भाषणाची सांगता केली.
प्रास्ताविकात जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी अर्जुन झाडे यांनी शासकीय योजनांचा लाभ अल्पसंख्याक समुदायातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नमूद केले. अल्पसंख्याकांमधील असुरक्षिततेची भावना दूर करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी अल्पसंख्याक समुदायाकडून सादर करण्यात आलेली निवेदने स्वीकारून ती शासनाकडे सादर करण्यात येतील, तसेच संबंधित अडचणी सोडविण्यास जिल्हा प्रशासन प्रयत्न करेल, असे आश्वासन देण्यात आले.
कार्यक्रमाच्या सहायक जिल्हा नियोजन अधिकारी प्रभाकर मठपती यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.