केदारनाथ बद्रीनाथ दर्शन म्हणजे स्वर्गाची अनुभूती :- ह भ प गणेश महाराज करंजकर

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 16/07/2025 10:30 PM

. केदारनाथ बद्रीनाथ दर्शन म्हणजे स्वर्गाची अनुभूती :- ह भ प गणेश महाराज करंजकर

भगूर रत्न ह भ प गणेश महाराज करंजकर ट्रस्ट यांच्या वतीने केदारनाथ बद्रीनाथ येथे भागवत कथा व यात्रा चे आयोजन करण्यात आले होते ह भ प गणेश महाराज करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेचे संपूर्ण व्यवस्थापन व नियोजन प्रवीण वाईकर यांच्याकडे देण्यात आले होते भगूर येथून दिनांक 22 जून रोजी 106 भाविक सा.4 वाजता नासिक रोड ते दिल्ली प्रवास करण्यासाठी  मंगला एक्सप्रेस ने प्रवास सुरुवात झाली गाडीमध्ये सायंकाळी सहा वाजता नित्यनेमाप्रमाणे हरिपाठ घेण्यात आला त्यानंतर सर्वांनी  भजनाचा आनंद घेतला सर्वच जण अत्यंत आनंदी होते.  प्रत्येकाच्या बऱ्याच गप्पा मारून शेवटी आम्ही मैफिल संपविली आणि गाडीमध्येच आम्ही निद्रेच्या आधीन झालो. नासिक रोड ते दिल्ली 20 तासाचा प्रवास आम्ही केला दिल्ली स्टेशनला उतरल्यानंतर प्रखर गर्मीचा सामना करावा लागला तेथून दोन बस द्वारे आम्ही हरिद्वार येथे आलो रूमवर आल्यावर फ्रेश होऊन जेवण उरकली थोडा आराम करून तेथे फिरण्याचा थोडा आनंद घेतला
दुसऱ्या दिवशी नाष्टा करून. तीन ग्रुप बनवून. तीन बस द्वारे आम्ही बद्रीनाथला जाण्यास निघालो. प्रथेप्रमाणे जयजयकारा झाला. आणि बस धावू लागली. हरिद्वार ते बद्रीनाथ प्रवास जवळजवळ 260 किलोमीटरचा होता. नेहमी प्रमाणेच सृष्टी सौंदर्य अवर्णनीय होते. रस्ता ही छान होता. डोंगर, दऱ्या, झाडी याबरोबर नदी ही प्रवासात आमची सोबत करत होती. प्रवासादरम्यान आमच्याबरोबर गणेश महाराज असल्यामुळे सर्वांमध्ये नवचैतन्य संचारले होते त्यादरम्यान गाडीमध्ये भजन. भक्ती. गीते. गवळणी. गायनाचा सर्वांनी पुरेपूर आनंद घेतला. खरं म्हणजे अशा साधुसंतांबरोबर यात्रा करणं म्हणजे हे एक आपलं भाग्यच आहे. खरं तर आपलं जीवन म्हणजेच एक यात्रा आहे. ह्या यात्रेचा उद्देश परमेश्वर प्राप्ती आहे. काळोखाकडून उजेडाकडे,असत्याकडून सत्याकडे, अधर्माकडून धर्माकडे आणि शेवटी जीवनाकडून मोक्षाकडे. हा बदल आपल्या आयुष्यात घडवून आणण्यासाठी
परमेश्वरी सहाय्याची आपल्याला नितांत गरज आहे. तो दीनदयाळ, भक्तवत्सल परमेश्वर आपल्यासोबत सतत असतो. त्याची प्रचिती मात्र आपल्याला अशा धार्मिक वातावरणात अनुभवायास मिळते.
असो, आमचा आजचा मुक्काम मायापुरी येथे होता. आठ सव्वा-आठ वाजता चहा पाणी झाल्यावर गावात एक चक्कर मारली. स्थानिकांशी गप्पा गोष्टी झाल्या. ह्या पहाडी लोकांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ असतो. मदत करण्यासाठी ते फार तत्पर होते. रात्रीचे जेवण करून आम्ही झोपी गेलो. पहाटे 5 वाजताच आम्ही बद्रीनाथला जाण्यासाठी निघालो. पहाटेचा गारवा अंगाला झोंबत होता. बसने वेग पकडला. बाहेर डोंगर, झाडी पळण्याचा खेळ सुरु होता. मध्येच डोळा लागत होता.जाग आली तेंव्हा जोशीमठ आले होते. जोशीमठ हे बद्रीनारायणाचे शितकालीन निवासस्थान आहे. येथे नृसिंहाचे भव्य मंदिरआहे. पण वेळेअभावी आम्हाला ते बघता आले नाही. थोडे पुढे गेल्यावर बसमधून विष्णुप्रयागचे दर्शन घेतले. अलकनंदा आणि धौलीगंगा या नद्यांचा संगम येथे होतो. घाटाच्या रस्त्यातून बस चालली होती. उंच उंच बर्फाच्छादित डोंगर, झुळझुळ वाहणारी नदी मन प्रसन्न करीत होती तर रस्त्यातले एकसारखे येणारे धोकादायक वळणे जीवाचा  थरकाप उडवीत होती. गोविंदघाट लागला तसा रस्ता अरुंद होत गेला, दाट जंगलातून वाट काढत बस चालली होती. एखाद्या डोंगर कड्याखालून जाणारी बस, काळजाचा ठोका चुकवीत होती. येथूनच हेमंकुंड साहेब आणि फ्लॉवर ऑफ व्हॅलीला जाण्याचा फाटा आहे. हिमालय पर्वतांच्या रांगा पाहत पाहत बस पार्किंग एरियात कधी आली हेच समजले नाही.
पार्किंग एरिया पासून मंदिरसाधारणतः 15 मिनिटे अंतरावर होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गरम कपड्यांचे विविध प्रकार विक्रीसाठी मांडून ठेवलेले दिसत होते. बद्रीनाथ मास्टरप्लॅन डेव्हलोपमेंट चे बांधकाम वेगाने होत असल्याचे अढळून येत होते. मंदिराच्या जवळ जाऊ लागलो तसे प्रसादाचे, पूजा सामानाचे दुकान, तेथे विक्रीसाठी असणाऱ्या चारधाम मंदिराच्या प्रतिकृती दिसू लागल्या. दर्शन टोकन घेऊन अलकनंदा नदीचा पूल पार करून आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. दर्शनासाठी भलिमोठी रांग होती. वरती ऊन, खाली दगड-धोंडे पार करत आम्ही चालत जाऊन रांगेत उभे राहिलो. तेथून भारतातील पहिले गांव 'माणागांव' दिसत होते. रांग अत्यंत धिम्या गतीने सरकत होती.
सुमारे ऐक तासानंतर मंदिरा जवळ आल्यावर मंदिरबघता क्षणीच 'प्रथम तूज पाहता ' ही मनाची अवस्था झाली. बद्रीनाथ मंदिर अत्यंत प्राचीन असून त्याचे बांधकाम दगडी आहे. मंदिरभव्य-दिव्य दिसत होते. दगडी भिंतीत कोरीव काम असून मोहक रंगात ते रंगविलेले होते. सभामंडपावर सोन्याचा कळस दिसत होता. तो कळस इंदोरच्या महाराणी श्रीमती अहिल्यादेवी होळकर यांनी अर्पण केला आहे. मंदिराचे शिखर सोन्याच्या पत्र्याने मढविलेले आहे. साक्षात वैकुंठ निवासी, लक्ष्मीपती श्रीविष्णूंना शोभेल असाच सर्व मान-मराताब होता. कोणत्याही देवाला काही तरी नात्यात बांधले की, आपलं देवाशी नातं खास होत. भोलेबाबांशी जसं माझे पितृत्वाचे नातं आहे, तसं कृष्णाशी म्हणजेच श्री. विष्णूशी माझे मित्रत्वाचे नाते आहे. त्या सख्याला भेटायला मन आतूर झाले होते. 'श्री बद्रीविशाल की जय' अशा जयघोषात रांग पुढे सरकत होती. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आम्ही गर्दीबरोबर आत ढकललो गेलो. प्रवेशद्वारातून आत गेल्याबरोबर एका मोठ्या वास्तुत आमचा प्रवेश झाला. वास्तूच्या मधोमध गर्भगृह, दर्शन मंडप, सभा मंडप दिसून आले. गाभाऱ्यात बद्रीनाथाची ध्यानमुद्रेत बसलेली शाळिग्रामाची मूर्ती ६० से.मी. उंच आहे. मूर्ती अत्यंत विलोभनीय आहे. खडतर प्रवास करून आल्याचं सार्थक झालं होत. विष्णू म्हटलं की शेषशायी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते. पण ध्यानमुद्रेतील ही मूर्ती मनाची स्थिरता, दृढता शिकवीत होती. मन असीम शांतता, प्रसन्नता ह्याचा अनुभव घेत होते. 
मंदिरात बद्रिनारायणाशिवाय नारद, नर-नारायण, लक्ष्मी, कुबेर, गरुड यांच्या मूर्ती आहेत.
दर्शन घेतल्यावर बाहेर आलो. लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिराच्या पाठीमागे बद्रीनारायण व लक्ष्मी मातेला अर्पण केलेल्या वस्त्रांची विक्री होते. प्रसाद म्हणून आम्ही तेथील काही वस्त्रे घेतली. आणि मंदिराबाहेर पडलो. मंदिराच्या खालच्या बाजूला असणाऱ्या गरम कुंडाचे दर्शन घेतले. नेहमीप्रमाणेच इतिहास जाणून घेण्यासाठी एका पुजाऱ्याची मदत घेतली. पौराणिक कथेनुसार नीलकंठ पर्वतावर (आत्ताचे बद्रीनाथ) महादेव व पार्वती यांचा निवास होता. भगवान विष्णू ध्यान आणि विश्रामासाठी जागा शोधत भूलोकी भ्रमण करीत होते. तेंव्हा त्यांना नील पर्वतावरील ही गुहा आवडली. पण तेथे महादेव व पार्वतीचे निवासस्थान आहे ही गोष्ट भगवान विष्णुस ज्ञात होती. भगवान विष्णुने युक्ती करून जागा मिळविण्याचे ठरविले. महादेव व पार्वती भ्रमण करीत असताना एक लहान बालक रडत असल्याचे त्यांना दिसून येते. अंगभूत वात्सल्याने माता पार्वती बालकाला गुहेत नेऊन स्तनपान करविते. बाळ झोपल्यावर दोघेही स्नानास बाहेर जातात. त्यावेळी भगवान विष्णू गुहेचे दार बंद करतात. महादेवांना हे सर्व ज्ञात होतेच. स्नान करून आल्यावर माता दरवाजा ठोठावते पण भगवान विष्णू सत्य सांगतात. तेंव्हा महादेव व माता केदारनाथकडे प्रयाण करतात. तेंव्हा पासून भगवान विष्णू बद्रीनाथ येथे वास करू लागले. सत्ययुगात त्यांचे प्रत्यक्ष दर्शन होत होते. मात्र द्वापारयुगात भगवान विष्णूंनी श्रीकृष्णाचा अवतार घेतल्याने त्यांचे मूर्तिस्वरूप दर्शन घडू लागले. या स्थानाला बद्रीनाथ हे नांव कसे प्राप्त झाले ह्याची कथा खूपच रोचक आहे. असे म्हणतात, भगवान विष्णू येथे तपश्चर्चेला बसले असता, उन्हापासून तसेच हिमवर्षावापासून त्यांचे रक्षण व्हावे, म्हणून माता लक्ष्मीने बदरीचे म्हणजेच बोरीच्या झाडाचे रूप घेतले. भगवान विष्णूंच्या ध्यान समाप्ती नंतर आपल्या पत्नीची तपश्चर्या त्यांना जाणवली. मातेने बदरीचे रूप घेऊन ही तपश्चर्या केली. त्यामुळे लक्ष्मी म्हणजेच बदरीचा नाथ तो बद्रीनाथ. त्यामुळे या स्थानाला भविष्यात ‘बद्रीनाथ’ म्हणून ओळखले जाईल असे भगवान विष्णुनी मातेस सांगितले. हिंदू धर्माच्या पुनः स्थापनेसाठी आदी शंकराचार्यांनी या मंदिराची स्थापना केली. मंदिरपरिसरात पंचशिला, ऋषिगंगा, कूर्मधारा, प्रह्लादधारा, तप्तकुंड, नारदकुंड इ. तीर्थे असून जवळच असलेला ब्रह्मकपाल नावाचा प्रशस्त खडक श्राद्धादी कर्मांसाठी पवित्र मानला जातो. येथे तर्पण केल्यास पितरांना मुक्ती मिळते असे म्हणतात. गणेश महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी पूजेचे साहित्य बरोबर घेतलेलेच होते तेथे आम्हाला व्यवस्थापकांनी हॉल उपलब्ध करून दिला. तेथे महाराजांनी. सर्वांना. समोर बसून विधीयुक्त पूजाअर्चा दर्पण करून घेतले.
हिमालय पर्वत शृंखलेत वसलेले, उत्तराखंडातील तसेच भारतातील चारधाम मंदिरातील एक प्रमुख स्थान असलेले बद्रीनाथ मंदिरयेथे दर्शन घेतल्याने पुनर्जन्म न होता वैकुंठाची प्राप्ती होते असे म्हणतात. देवर्षी नारद ह्यांनाही येथेच मोक्षप्राप्ती झाली होती. अशा पवित्र तपोभूमीत, हिमालयाच्या कुशीत मन शांत तर होतेच. पण माझे म्हणाल तर बऱ्याच प्रतीक्षेने प्राप्त झालेला सखा भेटीचा आनंद ओसंडून वाहत होता. तेथील पूजा व भोजन झाल्यानंतर आम्ही पुढे एक ते दीड किलोमीटर भारतातील पहिले गाव मानगाव गेलो. तेथे आम्ही भीम कुंड सरस्वती कुंड यांचे दर्शन घेतले. पाच पांडवांनी शेवटी स्वर्गरोहण केले तेथे पण आम्ही जाऊन आलो. प्रसन्न मनाने पुढील प्रवासासाठी आम्ही बसमध्ये बसलो.  आता पुढील यात्रेचा टप्पा केदारनाथ असणार होता. तिथे भोले बाबांच सानिध्य लाभणार म्हणून मन उल्हासित होत होते. आता फक्त प्रतीक्षा होती ती 24 तास सरण्याची. हरी-हर भेटीची उत्कंठा आता शिगेला पोहचली होती.
“शंभो महादेव सदाशिवा,
अंबुज नयना नारायणा,
हर ॐ हर ॐ सदाशिवा,
 हरी ॐ हरी ॐ नारायणा!”
क्रमश:-

शब्दांकन. सौ प्रांजल नवीन कुलकर्णी व भास्कर सोनवणे (पत्रकार)

Share

Other News

ताज्या बातम्या